अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील एका शासकीय कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या एका 38 वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (4 फेब्रुवारी) दिलेल्या फिर्यादीवरून कोल्हारपूर येथील तरुणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन एकनाथ ढेंगळे (रा. कन्हेरकर नगर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादीची ओळख 2017 मध्ये अर्जुन सोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून झाली. सुरूवातीला दोघांमध्ये केवळ मेसेज आणि फोनवर संभाषण होत असे. मात्र, हळूहळू या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
2018 मध्ये दोघांची पहिली भेट तारकपूर बस स्टँड येथे झाली. त्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे आणि भेटीगाठी वाढत गेल्या. अर्जुन याने पीडित महिलेला लग्नाचे वचन देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याने वारंवार तिच्या मुलालाही सांभाळण्याचे आश्वासन दिले. 2022 मध्ये अचानक अर्जुन याने आपल्या घरी या नात्याबाबत सांगितले असता, कुटुंबियांनी त्याला दुसर्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडले. मात्र, तो पीडित महिलेला सतत खात्री देत राहिला की, तो आपले लग्न केवळ घरच्यांच्या दबावाखाली करत असून, सहा महिन्यांत घटस्फोट घेऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारेल. पीडिता त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत वेळोवेळी हॉटेलमध्ये राहिली.
मात्र, 31 डिसेंबर 2024 रोजी जेव्हा तिने त्याच्याशी संपर्क साधून लग्नाविषयी विचारणा केली, तेव्हा त्याने शिवीगाळ करत लग्न करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.