अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात भावाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका 34 वर्षीय महिलेला दोघांनी मिळून मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (20 सप्टेंबर) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या घराशेजारी राहणार्या भावाच्या घरातून जोरजोरात भांडणाचा आवाज येत असल्याने तिकडे गेल्या. त्यावेळी संशयित आरोपींपैकी एक जण त्यांच्या भावाला मारहाण करत होता. पीडित महिलेने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना घाणघाण शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने पीडितेचा हात धरून तिला घरात ओढले आणि तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला. तो निघून गेल्यानंतर काही वेळाने दुसरा आरोपी तिथे आला आणि त्यानेही पीडित महिलेच्या कानशिलात लगावून धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.




