नेवासा |प्रतिनिधी| Newasa
अवैधरित्या मुरुम उत्खनन केल्याबाबतचा पंचनामा बदलून द्या या मागणीसाठी मंडलाधिकारी यांचे वाहन अडवून महिला मंडलाधिकार्यांच्या वाहनाला वाहन आडवे लावून शिवीगाळ व दमदाटी करुन धमकी दिल्याची घटना कुकाणा येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कुकाण्याच्या मंडलाधिकारी तृप्ती राजीव साळवे (वय 35) रा. बुरुडगांव रोड अहिल्यानगर हल्ली रा. कुकाणा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 24 एप्रिल रोजी मी तत्कालीन तलाठी बद्रीनाथ कमानदार, कोतवाल सुभाष महाशिकारे अशांनी भेंडा बुद्रुक गट नं. 265/3 मध्ये अक्षय बाबासाहेब बोरसे यांचे मालकीचे जेसीबी व डम्पर (एमएच 17 डीजे 7111) यावर कारवाई व जप्त पंचनामा करुन कुकाणा दुरक्षेत्र येथे लावून तहसिलदार यांना अहवाल पाठविला होता. तेव्हापासुन अक्षय बाबासाहेब बोरसे (रा. सकुळी ता. नेवासा) हा नेहमी आमचे ऑफिसमध्ये येवून आमचे वाहनावर केलेल्या कारवाईचा पंचनामा बदलून द्या, आम्ही निर्दोष असल्याचा (आम्ही गौण खनिज उत्खनन केले नाही) असा पंचनामा करुन द्या, नाहीतर तुम्हाला त्रास होईल, तुम्हांला येथे नोकरी करुन देणार नाही अशाप्रकारे धमक्या देत असे,
26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याचे सुमारास मी तलाठी श्री. आहिरे (सजा चिलेखनवाडी) यांचे समवेत त्यांची एक्सयूव्ही 300 (एमएच 17 सीएक्स 7128) ही मधून कुकाण्यामधुन वडुले येथे जमीन खरडून गेलेल्या शेताचे पंचनामे करणेकरीता जात असताना नेवासा-शेवगाव रोडवर जेऊर चौकाजवळ कुकाणा येथे असताना आमचे गाडीचे पाठीमागे अचानक पांढरे रंगाची ईनोव्हा क्रिस्टा (एमएच 16 डीके 7111) ही जोरात घेवून येवून आमचे वाहनाला आडवी लावून सदर गाडीमधून अक्षय बाबासाहेब बोरसे श्रीराम बाबासाहेब बोरसे (दोघे रा. सुकळी), चंद्रकांत पाडळे (पूर्ण नाव माहिती नाही) रा. चिलेखनवाडी ता. नेवासा व इतर तीन अनोळखी इसम असे खाली उतरुन म्हणाले की, आम्हांला पाहून पळून जातात काय? तुम्हाला आमचेबरोबर लगेच येवून आम्हाला नव्याने पंचनामा करुन द्या, आम्ही सांगतो त्याप्रमाणे आम्हांला आमचे बाजुने पंचनामा करुन द्या, आम्ही दिलेले पंच घ्या असे म्हणून माझेशी व माझे सोबत असलेले कामगार तलाठी श्री. आहिरे यांचेशी हुज्जत घालुन शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली व रस्त्यावर मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करुन अंगावर धावून येवून मी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मला शिविगाळ केली. तसेच सार्वजनिक जागी मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करुन माझेशी गैरशिस्तीचे वर्तन करीत मला जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून माझी कायदेशीर तक्रार आहे.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात बीएनएस 132, 126 (2), 189(2), 191(2), 190, 351(2), 352, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 110, 117, 37(1),, 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश विष्णू पाटील हे करत आहेत.




