राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा घेतलेला निर्णय विकोपाला जाऊन एका गटाने महिला ग्रामसेवकाला भरआठवडे बाजारात रक्तबंबाळ करत मारहाण केली. तसेच ग्रामपंचायतचे इतर कर्मचार्यांसह पदाधिकार्यांनाही मारहाण झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील ग्रामसेविका शकिला पठाण या मंगळवार दि. 15 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ग्रामपंचायतची शासकीय वसुली करत होत्या. त्यावेळी तेथे असलेले आरोपी म्हणाले, ‘तु आमचे गाळे पाडले काय? असे म्हणून त्यांनी ग्रामसेविका शकीला पठाण यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या दुकानावरही हल्ला करण्यात आल्याचे समजते.
यामध्ये ग्रामस्थांच्या चर्चेनुसार महिला ग्रामसेविका शकिला पठाण यासंह ग्रामपंचायत लिपीक तुषार विधाटे, कैलास केदार, विलास बुळे यांनाही मारहाण झाली. तसेच भाऊसाहेब यादव व प्रकाश यादव यांनाही एका गटाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचे समजते. महिला ग्रामसेविका पठाण या गंभीर जखमी असून त्यांच्यासह 5 जणांना अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामसेवक संघटनेसह पंचायत समिती अधिकारी, कर्मचार्यांनी मोर्चा काढत पोलिस व महसूल प्रशासनासमोर ठिय्या मांडत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे व तालुका अध्यक्ष दादासाहेब भिंगारदे यांनी काल दि. 16 एप्रिलपासून जिल्हाभर ग्रामपंचायतीचे कामकाज बंद आंदोलन सुरू होणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही. तोपर्यंत ग्रामसेवक कामकाज बंद ठेवणार असल्याचे पदाधिकार्यांनी जाहीर केले आहे.
याप्रकरणी ग्रामसेविका शकीला पठाण यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी सखाहरी बबन काकडे, अमोल सखाहरी काकडे, राहुल सखाहरी काकडे, अनिल सखाहरी काकडे, दत्तात्रय बबन काकडे, निर्मला सखाहरी काकडे, ज्योती दत्तात्रय काकडे, सौरभ सुनील मुसळे, सिताराम गंगाधर दुधाट, प्रशांत सिताराम दुधाट, अविनाश गागरे या अकरा जणांवर गु.र.नं. 415/2025 भारतीय न्याय संहिता कलम 132, 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 324 (5), 189 (4), 191 (2), 333 प्रमाणे मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ग्रामसेविका शकिला पठाण यांच्यासह कर्मचारी व पदाधिकार्यांना मारहाण झालेल्या निषेधार्थ काल म्हैसगाव बंद ची हाक ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी दिली होती. त्यास गावातील व्यावसायिकांनी प्रतिसाद देऊन गाव दिवसभर स्वयंस्फुर्तीने बंद ठेवले.