करंजी |वार्ताहर| Karanji
नगर तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिके विरोधात पाथर्डी तालुक्यातील एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप करत जिल्हा परिषदेसमोर गुरूवारी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला होता. यावेळी संबंधित महिलेने पाथर्डी तालुक्यातील एका शिक्षिकेने माझ्या नवर्यासोबत गुपचूप लग्न करत त्याच्यापासून एका अपत्याला जन्माला घातले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात बदलीचा लाभ घेतला असून आता नेमणुकीच्या मुख्यालयात राहत असल्याचे खोटे दाखले सादर केले असल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला होता. या इशार्याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली आहे. पाथर्डी तालुक्यातील गृहीणी असणार्या महिलेने प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत नगर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेने माझ्या पतीबरोबर गुपचूप विवाह केला. त्यानंतर शाळेवर हजर असल्याचे दाखवून सोलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रसुती करून एका मुलाला जन्म दिला. तसेच संबंधित महिला शिक्षिका विवाहित असून घटस्फोटीत असल्याचे कागदपत्र सादर करून सोलापूर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतःची आंतरजिल्हा बदली करून घेतली.
ग्रामसभेचा ठराव नसताना मुख्यालयी राहत असल्याचे खोटे स्वयंघोषणापत्र दाखल करून घर भाडे भत्ता घेतल्याने या शिक्षिकेवर प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यात करून घेतलेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच खोटी माहिती शिक्षण विभागाला दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. संबंधित गृहीणी असणार्या महिलेच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित महिला शिक्षिकेची विभागीय चौकशी सुरू केली असून याबाबत संबंधित महिलेला चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर संबंधित महिलेने आत्मदहनाचा इशारा मागे घेतला. हा प्रकार पाहून टीव्हीमध्ये गाजलेल्या ‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेला साजेशी घटना असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.