अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी माझी बहिण लाडकी योजना जाहीर केलेली आहे. या योजनेसाठी रहिवासी आणि उत्पन्नाचे दाखले आवश्यक असून हे दाखल महिलांना विनाविलंब देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने हे दाखले उपलब्ध करावेत. यासह योजना राबवतांना येणार्या अडचणीबाबत येत्या दोन ते तीन दिवसात सरकार निर्णय घेणार आहे. तोपर्यंत योजना राबवण्यास सुरूवात करावी, अशी सुचना राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी दिल्या.
मंत्री तटकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महिला बालकल्याण विभागाच्या जिल्हा पातळीवर अधिकार्यांची व्हीसीद्वारे सोमवारी दुपारी बैठक घेतली. तसेच ही योजना राबवतांना काय काय अडचणी येवू शकतात, हे अधिकार्यांकडून समजावून घेतले. यावेळी मंत्री तटकरे यांना योजनेसाठी आवश्यक असणार्या रहिवासी प्रमाणपत्र (डोमेसाईल) काढतांना तांत्रिक अडचणी येण्यार आहेत. रहिवासी प्रमाणपत्रासाठी जन्माचा दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असून तो महिलांकडे उपलब्ध नसल्यास हे प्रमाणपत्र काढतांना अडचण येणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यावर मंत्री तटकरे यांनी योजना राबवतांना येणार्या सर्व अडचणी समजून घेत त्यावर सरकार पातळीवरून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगत जिल्हाधिकारी यांनी देखील योजनेसाठी आवश्यक असणारे दाखले महिलांना तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष घालावे, दाखले देण्यास विलंब करू नयेत, अशा सुचना दिल्या. तसेच 1 ते 15 जुलैदरम्यान योजनेत पहिल्या टप्प्यात नोंदणी करण्यात येणार आहे. योजनेचा हा पहिला टप्पा असून त्यानंतर देखील योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार आहे. यामुळे महिलांनी काळजी करून येते. योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येणारे बदल वेळावेळी कळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नगर जिल्ह्यातून अधिकारी या व्ही.सी.च्या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.