Friday, May 3, 2024
Homeब्लॉगBlog : पृथ्वीची आस धरा...अन्न, हवा, पाणी स्वच्छ करा!

Blog : पृथ्वीची आस धरा…अन्न, हवा, पाणी स्वच्छ करा!

आज ७ एप्रिल, जागतिक आरोग्य दिन! या वर्षासाठी ‘आपली पृथ्वी, आपले आरोग्य’ ही संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्याअंतर्गत ‘आपली पृथ्वी, आपले आरोय’ – आपली हवा, पाणी आणि अन्न स्वच्छ ठेवा’ ही संकल्पना देण्यात आली आहे. त्यानिमित्त….

विसाव्या शतकात दळणवळण वाढले आणि जगातील सर्व देश एकमेकांच्या जवळ आले. कोणताही आजार स्थानिक उरला नाही. पूर्वी प्रत्येक देश वा खंडात एकाच आजारावर विभिन्न उपचार व्हायचे. यात एकवाक्यता यावी व विविध ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनाची व नवीन माहितीची देवाणघेवाण व्हावी या हेतूने ७ एप्रिल १९४५ ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. त्याप्रीत्यर्थ पुढे हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

- Advertisement -

मग त्या-त्या काळातील महत्वाची आरोग्य समस्या विषयी एखादी संकल्पना आणि घोषवाक्य जाहीर करून त्याविषयी विविध कार्यक्रम जगभर साजरे करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून सूचना व मार्गदर्शन प्राप्त होऊ लागले. यावर्षी ‘आपली पृथ्वी आपले आरोग्य’ या संकल्पनेअंतर्गत ‘आपले अन्न, हवा, पाणी स्वच्छ ठेवा’ अर्थात ‘अवर प्लॅनेट, यावर हेल्थ’ – क्लिन अवर एअर, वॉटर आणि अन्न’ हा विषय देण्यात आला आहे. त्याविषयी आरोग्यजागृतीपर व्याख्याने, स्पर्धा, परिसंवाद, कार्यशाळा आदी उपक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे. आरोग्य संघटनेला ही संकल्पना का द्यावीशी वाटली? त्यासाठी सध्यस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे.

निसर्गावर कुऱ्हाड

मानवी निवारा, संरक्षण, अन्न अशा मूलभूत गरजांसाठी बेसुमार वृक्षतोड, पाण्याचा अनिर्बंध वापर, ऊर्जा निर्माण करणाऱ्या खनिजांचे अतिरिक्त उत्खनन, कारखानदारी अशा विविध कारणांनी होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास आता धोकादायक स्थितीत येऊन पोहोचला आहे. पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. पिण्यायोग्य पाण्याचे साठे कमी होत आहेत. शेतीस उपयुक्त जमिनीवर काँक्रीटचे जंगल तसेच शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर आदींमुळे पिकणारे अन्न निकृष्ट दर्जाचे मिळत आहे. भारतातील बहुतेक शहरांतील प्रदूषणाची पातळी अतिशय घातक बनली आहे.

हवेचे प्रदूषण

आपण वेळीच सावध झालो नाही तर अतिशय सुंदर असणारी आपली पृथ्वी एक विराट वाळवंट बनून आपल्या पुढच्या पिढ्यांचे जगणे मुश्कील होणार आहे. अन्न, पाणी, हवा, पर्यावरण आदींतील या बदलांमुळे आपली स्थिती झाली आहे तेही जाणून घेऊ या!

तेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांच्या अतिरिक्त ज्वलनामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकार आणि मेंदूच्या विकारामुळे दर मिनिटाला १३ व्यक्ती मृत्युमुखी पडत आहेत. आजही दर १० पैकी ९ व्यक्तींना दूषित हवा मिळत आहे. वातावरण बदलामुळे कर्करोग, अस्थमा आणि डासांसारख्या कीटकांमुळे होणारे डेंग्यू , हिवताप आदी आजार वाढत आहेत. जगातील निम्म्या लोकसंख्येला सुरक्षित शौचालय न मिळाल्यामुळे पोलिओसारखे दुर्धर आजार नव्याने डोके वर काढू पाहत आहेत.

पिण्यायोग्य पाणी

जवळ-जवळ २०० कोटी नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही. अस्वच्छ आणि प्रदूषित पाण्यामुळे जगभरात दरवर्षी तब्बल ८।। लाख व्यक्ती मृत्युमुखी पडतात. तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दरवर्षी 80 लाख इतके प्रचंड आहे. तंबाखूपासून फक्त सिगारेट बनवण्यासाठी दरवर्षी 60 कोटी झाडांचे शिरकाण केले जाते. बांधकाम, फर्निचर आदी कारणांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा यात समावेश नाही. तंबाखूजन्य सर्वच पदार्थांपासून सर्वार्थाने दूर राहणे हाच त्यावरचा उपाय आहे.

कचरा व्यवस्थापन

नेहमीच्या व विशेषतः जैविक कचऱ्याची नीट विल्हेवाट लावणे खूप महत्त्वाचे असते. उदा. अशा कचऱ्यामधील इंजेक्शन्सच्या सुयांमुळे काविळीसारखे अनेक गंभीर आजार उद्भवतात. वाढत्या तापमानामुळे विविध ठिकाणी पूरसदृशस्थिती निर्माण होऊन होणारी प्रत्यक्ष जीवित, वित्तहानी आणि याचबरोबर डेंग्यू, हिवताप, कॉलरा यासारख्या आजारांनी दरवर्षी २०० कोटी लोकसंख्येला संकटांचा सामना करावा लागतो.

स्वतःची, सामूहिक जबाबदारी

वरील सर्व अघटित टाळायचे असेल तर जगातील प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतःची तसेच सामूहिक जबाबदारी ओळखून व समजून आपली प्रत्येक कृती पर्यावरणास धोका तर निर्माण करीत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उदा. वीजनिर्मितीसाठी कोळसा, तेल, नैसर्गिक वायू यांच्याऐवजी अपारंपारिक सौरऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात करावी. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीस अग्रक्रम द्यावा. पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून वापरलेल्या पाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाईल याकडे विशेष लक्ष पुरवणे गरजेचे आहे. वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक वसाहतींत कार्बनसारख्या घातक वायूंचे कमीत-कमी उत्सर्जन व्हावे तसेच कारखानदारीदरम्यान वापरलेल्या पाण्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने व्हावी यासाठी एकत्रित प्रयत्न होणे काळाची गरज आहे.

युवापिढी

विशेषतः आपल्या लहान व किशोरवयीन मुलांना लहानपणीच पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छ अन्न, हवा, पाणी यांचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले पाहिजेत. त्यातून मुलांमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करावा. जीवनशैलीत नियमित व्यायाम, नैसर्गिक आहाराचे सेवन, पुरेशी झोप, अतिरिक्त तणाव टाळणे, शक्य होईल तेव्हा वाहनांचा वापर टाळून सायकलीस प्राधान्य देणे किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे याला सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येकाने वर्षातून किमान दोन वेळा वृक्षारोपण करून त्यांच्या गोपनाकडेदेखील लक्ष देण्यासाठी वेळ काढावा.

प्लास्टिकचा भस्मासूर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिक नावाचा भस्मासूर अख्खे जग गिळंकृत करीत आहे. प्लास्टिकचा अनावश्यक वापर असणाऱ्या कित्येक वस्तूना नकार देऊन आपण यादृष्टीने एक सुरुवात तर नक्कीच करू शकतो . विशेषतः दुकाने, मॉल्समध्ये पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशव्या आग्रहपूर्वक टाळा. प्लास्टिक बाटल्यांमध्ये असणारी शीतपेये किंवा अन्नपदार्थ यांना नकार द्या. कापडी पिशव्यांना प्राधान्य देऊन आपण एक पाऊल पुढे टाकू. निर्माण झालेल्या प्लास्टिक कचऱ्याची स्थानिक प्रशासनामार्फत शास्त्रीय विल्हेवाट कशी लावता येईल. याबद्दल तज्ञांशी संवाद साधल्यास एक अतिशय उत्तम असे समाजकार्य तुमच्या हातून घडू शकते. प्रत्येक घरात किंवा इमारतींत सौरऊर्जा निर्मिती संचाद्वारा पारंपारिक विजेसाठी लागणारा कोळसा, पाणी यांची तुम्ही अतिरिक्त बचत करून पर्यावरणात मोलाची भर टाकू शकता. पर्यावरणाचे रक्षण झाले की पर्यायाने आपले अन्न, पाणी व हवा स्वच्छ राहील !

सारांश एवढाच की, पर्यावरण संवर्धन व अन्न, पाणी हवा शुद्ध ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यादृष्टीने प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय नियमितपणे अवलंबले तरच आपली पृथ्वी खरोखरच स्वर्गाहून रम्य होईल.

– डॉ. प्रतिभा औंधकर, कार्यकारिणी सदस्य, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखा.

- Advertisment -

ताज्या बातम्या