Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक सांकेतिक भाषा दिन : महत्वाच्या सांकेतिक निर्देशांचे प्रात्यक्षिके सादर

जागतिक सांकेतिक भाषा दिन : महत्वाच्या सांकेतिक निर्देशांचे प्रात्यक्षिके सादर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जागतिक सांकेतिक भाषा दिनाबद्दल(World Sign Language Day) जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्यावतीने सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आला,मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर जागतिक कर्णबधीर सप्ताह हा साजरा करण्यात येतो, संयुक्त राष्ट्र संघाने २३ सप्टेंबर हा सांकेतिक भाषा दिन म्हणून घोषित केला आहे.

- Advertisement -

जागतिक स्तरावर कर्णबधीर सप्ताह साजरा केला जात असून जिल्हा परिषद नाशिकचा समाजकल्याण विभाग, मूकबधीर असोसिएशन, नाशिक, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड, युनिट महाराष्ट्र श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवसाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात करण्यात आले होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, मूकबधीर असोसिएशनचे अध्यक्ष दस्तगीर कोकणी, सचिव गोपाळ बिरारे, कशिष छाब्रिया हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले, यात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांकेतिक भाषा दिनाचे महत्व अधोरेखित केले. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा सांकेतिक भाषा दिनानिमित्त शुभेच्छा संदेश यावेळी दाखवण्यात आला, उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना सांकेतिक भाषेतील इंग्रजी वर्णमाला त्याचबरोबर दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या महत्त्वाच्या सांकेतिक निर्देशांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. जिल्हा परिषद सेवेतील दिव्यांग कर्मचारी कविता चव्हाण, पल्लवी पवार, स्वप्नील गोडबोले यांनी काम करत असताना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभव हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मूकबधीर असोसिएशन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नाटिका सादर केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांकेतिक भाषा शिकणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सांकेतिक भाषा शिकण्यासाठी जिल्हा परिषदेत विशेष वर्ग घेण्यात यावे असे सांगितले. यावेळी सांकेतिक भाषेत बोलण्याची शपथ सर्व उपस्थितांनी घेतली. कार्यक्रमाच्या समारोपवेळी राष्ट्रगीत सुद्धा सांकेतिक भाषेत म्हणण्यात आले. सूत्रसंचालन अर्चना कोठावदे यांनी केले. माई लेले शाळेच्या वतीने रश्मी दांडेकर, अनिता निकम, मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या