नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar
येथील नगरपालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात आज दुपारी पोहताना १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत तरुण हा बाम्हणे (ता.शिंदखेडा) येथील रहिवासी असून एकुलता एक मुलगा होता. दरम्यान, जलतरण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संबंधांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील ललित सुधीर पाटील (वय १८), हरीश दगडू निकम (वय २१), निलेश सुनील पाटील (वय १७), हर्षल संजय पाटील (वय १७), दुर्गेश प्रवीण पाटील (वय १७) व हितेश अधिकार पाटील (वय १७) हे सहा तरुण दुपारी २ वाजेच्या रेल्वेने नंदुरबारला आले. त्या तरुणांनी शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात येथे येऊन पोहण्याचा आनंद घेतला. सदर तरुण पाच फूट खोल पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना ललित सुधीर पाटील हा आठ फूट पाण्यात गेला. या ठिकाणी पोहत असताना तो पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केल्याने सुरक्षा गार्डन ललित यास बाहेर काढले.
मात्र, तो बेशुद्ध झाला. त्यामुळे मित्रांनी त्याला रिक्षातून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉ.मंगला तुंगार यांनी तपासणी करून ३.४५ वाजता ललित यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, एपीआय वानखेडे, पीएसआय स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तत्पूर्वी ललित याच्या मित्रांनी घटनेची माहिती बाम्हणे येथील नातलग व गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच ललितचे काका, काकू इतर नातलग व गावकरी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी काका व काकूने जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.
ललित हा बाम्हणे येथील सुधीर पाटील यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात एक बहीण आहे. याबाबत हरीश निकम याने दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पीएसआय स्वप्नील पाटील करीत आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत ललित याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. नातलग व गावकऱ्यांनी जलतरण प्रशासनाने दुर्लक्ष केले. गार्ड होते मग ललित पाण्यात बुडालाच कसा? आदी प्रश्न उपस्थित करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. योग्य त्या पद्धतीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पीआय मनेळ यांनी दिले.