Wednesday, February 4, 2026
HomeनगरCrime News : तरूण व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक; क्रिप्टो करन्सीच्या जाळ्यात

Crime News : तरूण व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक; क्रिप्टो करन्सीच्या जाळ्यात

राजस्थानमधील व्यक्तीविरुद्ध गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील सर्जेपुरा परिसरातील एका तरुण व्यावसायिकाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात राजस्थानमधील व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम शब्बीर शेख (वय 31, रा. साई अपार्टमेंट, बेलदार गल्ली, सर्जेपुरा, नगर) असे फसवणूक झालेल्या तरूण व्यावसायिकाचे नाव आहे. नदीम यासीन खान (रा. सिकर रामगड, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

फिर्यादी वसीम शेख हे खेळाच्या मैदानांचे बांधकाम व विकासकामांचे कंत्राट घेतात. जानेवारी 2025 मध्ये त्यांची ओळख नदीम खान याच्याशी झाली होती. ओळख वाढल्यानंतर नदीम खान याने ‘यूएसडीटी’ या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा व जलद नफा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास बसावा यासाठी नदीमने वसीम यांना कमी कालावधीत चांगला परतावा मिळवून दिला. त्यामुळे वसीम यांचा त्याच्यावर विश्वास बसला. या विश्वासाच्या आधारे वसीम यांनी पुढे गुंतवणूक वाढवली. दरम्यान, ऑगस्ट 2025 मध्ये वसीम यांनी पुन्हा 10 हजार यूएसडीटी (भारतीय चलनानुसार सुमारे 10 लाख रुपये) नदीम खान याच्या खात्यावर पाठवले.

YouTube video player

मात्र, काही दिवसांनंतर वसीम यांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता, नदीम खान याने विविध कारणे देत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर काही दिवसांतच नदीम खान याने आपला भ्रमणध्वनी बंद केला व सर्व प्रकारचा संपर्क तोडला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वसीम शेख यांनी सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्यात नदीम यासीन खान याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...