Friday, March 20, 2026
HomeनगरNewasa News : भेंडा येथील मुळा उजव्या कालव्यात बुडालेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशीही...

Newasa News : भेंडा येथील मुळा उजव्या कालव्यात बुडालेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच

भेंडा (वार्ताहर)

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक परिसरात मुळा उजव्या कालव्याच्या पात्रात बुडालेल्या स्वप्नील लक्ष्मण मगरे (वय ३२, रा. पाथरवाला, ता. अंबड, जि. जालना) या तरुणाचा सलग दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही. प्रशासकीय यंत्रणा, पोलीस दल आणि स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने कालव्याच्या पात्रात शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून, अद्याप यश आलेले नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील मगरे हा आपल्या मित्रांसोबत मढी येथे दर्शनासाठी जात होता. मंगळवारी, १७ मार्च रोजी सकाळी भेंडा येथे मुळा उजव्या कालव्यात अंघोळीसाठी उतरला असता, पाय घसरल्याने तो पात्रात पडला आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेला. सध्या कालव्याला आवर्तन सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग आणि वेग अत्यंत जास्त आहे, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. सोबत असलेल्या मित्रांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक नागरिक आणि पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच नेवाशाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार, स्थानिक पोलीस आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोधकार्य सुरू केले. मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही स्वप्नीलचा पत्ता लागला नाही. अंधार पडल्याने रात्री हे काम थांबवण्यात आले होते. मात्र, आज बुधवारी (१८ मार्च) पहाटेपासूनच पुन्हा एकदा व्यापक स्तरावर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

आज सकाळी तहसीलदार डॉ. बिरादार आणि पोलीस उपनिरीक्षक पवार हे नगरहून पाचारण करण्यात आलेल्या अग्निशमन दलाचे जवान व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. शोधकार्यासाठी बोट, टायर आणि गळाचा (हुक) वापर केला जात आहे. मात्र, कालव्यातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शोधकार्यात सुलभता यावी यासाठी कालव्यातील पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर तरुणाचा शोध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे पाथरवाला परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुपारपर्यंत तरी शोध पथकाच्या हाती काहीही लागलेले नव्हते.

ताज्या बातम्या