सिन्नर । विलास पाटील
सिन्नरचा भूमिपुत्र ज्योतिषशास्त्रात जगभरात नाव कमवतो, ईशान्येश्वरासारखे भव्य मंदिर उभारतो म्हटल्यावर सिन्नरकरांनी त्याला डोक्यावर घेतले. श्रावण महिना, महाशिवरात्र असो की मंदिरासह त्यांचा स्वतःचा वाढदिवस असो, सिन्नरकरांनी जमेल तेवढे योगदान दिले. मात्र, नाशकात त्यांच्याविरोधात महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅप्टन अशोक खरातचे हिडीस रूप सिन्नरकरांसमोर आले. असे काही अघटित मंदिराच्या, ज्योतिष सांगण्याच्या आड होत असेल यावर कुणाचा विश्वासच बसेना. त्यामुळे जवळपास ७२ तासांपासून सिन्नरकरांमध्ये याच विषयाची चर्चा होत आहे. त्यातच सोशल मीडियातून येणारी माहिती सिन्नरकरांना सुन्न करणारी ठरत आहे.
कॅप्टन खरात असा आला उदयास
कॅप्टन खरात याचे मूळ गाव तालुक्यातील कहांडळवाडी असले तरी त्याने बस्तान बसवले ते मिरगावला. साधारण ४०-५० वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून घरातून निघून गेलेला खरात वीस-बावीस वर्षांनी पुन्हा आपल्या आप्तस्वकियांना भेटल्याची चर्चा आहे. मर्चेंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षे तो नाशकातच राहिला. सिन्नरच्या सोनांबे येथील कै. के. एल. पवार यांची करिअर अॅकेडमी तेव्हा नाशकात चांगलीच नावारूपाला आली होती. त्यावेळी एमपीएससीच्या परीक्षांचे पेपर फुटण्याची पाळेमुळेही या अॅकेडमीपर्यंत येऊन पोहोचली होती. त्या काळात खरात या अॅकेडमीमध्ये काम करत होता, असे अनेक लोक सांगतात. खरातच्या घराच्या भाड्यापासून त्याच्या खाण्या-पिण्याचा खर्चही पवारच करायचे. खरातांचे लग्नही त्यांनीच जुळवून दिल्याची चर्चा आहे. त्या काळात या ॲकेडमीने अनेक चढउतार अनुभवले. काही वर्षात दोघांचे बिनसले आणि खरातने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात स्वतःचे कार्यालय सुरू केले. अंकशास्त्राच्या सहाय्याने भविष्य सांगण्याचे त्याचे कसब त्यापूर्वीच हळूहळू सर्वांना कळू लागले होते. त्यातून त्यांच्याकडे येणाऱ्यांची गर्दीही वाढू लागली होती.
ऑफिसबॉयच निघाला कटामागील मास्टरमाईंड; ५८ महिलांच्या अब्रुंचा इतक्या ‘कोटींत’ सौदा, कसा अडकला खरात?
कथित भविष्यवाणी खरी !
माणिकराव कोकाटे पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा खरातच्या नावाचा खूपच बोलबाला झाला होता. कोकाटे विजयी होतील, मात्र त्यांना विजयाचा आनंद लुटता येणार नाही, असे खरातने सांगितल्याची त्यावेळी चर्चा होती. कोकाटे विजयी झाले, मात्र मतमोजणीच्याच रात्री नाशिकहून येणाऱ्या कोकाटे समर्थकांच्या कारचा पळसेजवळ अपघात होऊन चार तरुण कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. खरातच्या भविष्यवाणीचा या अपघाताशी संबंध जोडण्यात आला. मात्र, आ. कोकाटे त्याआधी आणि त्यानंतरही कधी खरातसोबत सिन्नरकरांना दिसले नाहीत. मात्र, त्यानंतर खरात सिन्नर तालुक्यातच रमला.





