राहाता |प्रतिनिधी| Rahata
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजले असून राहाता तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होताच तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक मातब्बर नेत्यांच्या हक्काच्या जागांवर आरक्षणाची कुर्हाड पडल्याने त्यांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे नव्या पिढीला आणि विशेषतः महिलांना राजकारणात संधी मिळाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राहाता तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण आरक्षित झाल्याने आता इच्छुकांना आपल्या नशिबाची चाचपणी करावी लागणार आहे. जुन्या आणि अनुभवी नेत्यांना आता कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवावे लागणार आहे किंवा इतर सुरक्षित जागा शोधाव्या लागणार आहेत. यामुळे उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच आणि गटबाजीला आणखी धार येण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद गटांचे आरक्षण राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणारे ठरले आहे. अनेक विद्यमान नेत्यांना त्यांच्या हक्काच्या जागांवरून पायउतार व्हावे लागणार आहे.
गट क्र. 21 (पुणतांबा) हा गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या भागातील राजकीय समीकरणात बदल होणार आहे. गट क्र. 22 (वाकडी) हा गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने येथील विद्यमान नेत्यांना पर्यायी जागा शोधावी लागेल. गट क्र. 23 (साकुरी) हा गट अनुसूचित जाती-महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे या गटातून महिला नेतृत्व पुढे येणार हे निश्चित आहे. गट क्र. 24 (लोणी खु.) हा गट ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने ओबीसी समाजाच्या उमेदवारांना संधी मिळाली आहे. गट क्र. 25 (कोल्हार बु.) हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याने या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळेल.
राहाता पंचायत समितीच्या एकूण 10 गणांपैकी तब्बल 5 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. ही आकडेवारी महिला उमेदवारांना मोठे बळ देणारी असून, आता राजकीय पक्षांना महिलांचा प्रभावी चेहरा शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सावळीविहीर बु. (अनुसूचित जमाती-महिला), साकुरी (अनुसूचित जाती-महिला), कोल्हार बु. (ना.मा.प्र. महिला) आणि पुणतांबा व दाढ बु. (सर्वसाधारण महिला) या पाच जागांमुळे अनेक विद्यमान पुरुष उमेदवारांची संधी हुकली आहे. इतर राखीव जागांमध्ये लोहगाव (अनुसूचित जाती) आणि अस्तगाव (ना.मा.प्र.) या जागा आरक्षित झाल्याने या गणांमध्येही इच्छुकांना मोठी स्पर्धा करावी लागेल. केवळ वाकडी, लोणी बु. आणि लोणी खुर्द या तीन जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी उपलब्ध असल्याने या जागांवर उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस दिसेल.
आरक्षणाने सर्वात मोठी उलथापालथ साकुरी आणि कोल्हार बु. परिसरात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, साकुरी जिल्हा परिषद गट आणि साकुरी पंचायत समिती गण दोन्ही अनुसुचित जाती-महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. यामुळे साकुरी आणि परिसरातील राजकारणात महिला नेतृत्वालाच सर्वाधिक महत्त्व येणार आहे. एकाच गावातून दोन महिलांना मोठ्या पदावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
कोल्हार बुद्रुक जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असला तरी त्याच गणातील पंचायत समितीचे आरक्षण ना.मा.प्र. महिलांसाठी झाले आहे. हा एक विरोधाभास असल्यामुळे या दोन्ही जागांवर उमेदवारीसाठी वेगळेच राजकारण पाहायला मिळेल. एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे.
हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. अनेकांनी तातडीने बैठक घेऊन पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू झाले असून जुन्या नेत्यांकडून त्यांच्या पत्नी, कन्या किंवा कुटुंबातील अन्य महिलांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आगामी काळात गट-तट, युती-आघाडी आणि पक्षांतर्गत वाद-विवादांचे राजकारण अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.





