अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेच्या 75 गटांचा आणि पंचायत समितीच्या 150 गणांच्या आरक्षणाची सोडती सोमवार (दि.13) रोजी पार पडल्या. नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या तर तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या सोडती काढण्यात आल्या. नगरला काढण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सोडतीमध्ये 75 गटापैकी 38 ठिकाणी महिलांचे आरक्षण राहणार आहे. तसेच यापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने यंदा जिल्हा परिषदेत पुन्हा महिला राज येणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये 75 पैकी सर्वसाधारण 39, ओबीसी 20, अनुसूचित जाती 9 आणि अनुसूचित जमाती (महिलांसह) 7 गट आरक्षीत झालेले आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गटनिहाय आरक्षण सोडती अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित करण्यात आले. गटांच्या आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय डावपेचांना सुरवात होणार आहे. सोडतीच्या प्रक्रियेदरम्यान सुरवातीला जिल्हा परिषदेच्या 75 गटांमध्ये प्रवर्गनिहाय संख्या सांगण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षेखाली जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत काढण्यात आल्या.
यावेळी बोल्हेगाव (नगर) येथील शहाबाज पटेल या बालकाच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सुरूवातीला जिल्ह्यातील लोकसंख्यानेनूसार अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव गटांची घोषणा करण्यात येवून हे गट बाजूला ठेवून उर्वरित गटातून ओबीसीचे 20 (महिला आरक्षणासह) आणि त्यानंतर 39 सर्वसाधारण (महिला आरक्षणासह) सोडती काढण्यात आल्या. आरक्षणसोडतीनंतर जिल्हा परिषदेत महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या 75 गटांपैकी 38 ठिकाणी महिला सदस्यांंना आरक्षणानूसार उमेदवारी करता येणार असून उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गातून कोणत्याही प्रवर्गातील महिला उमेदवारांना संधी राहणार असल्याने जिल्हा परिषदेत पुरूष सदस्यांपेक्षा महिला सदस्यांची संख्या ही अधिक राहणार आहे.
दरम्यान, काल झालेल्या सोडतीत श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगरमध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या असल्याने जिल्ह्यात हा गट पहिल्या नंबरला आरक्षीत करण्यात आला. त्यानंतर नागरदेवळे (नगर), उंदिरगाव (श्रीरामपूर), वाकडी (राहाता), पुणतांबा (राहाता), साकुरी (राहाता), दरेवाडी (नगर), बेलापूर बु. (श्रीरामपूर) आणि भातकूडगाव (शेवगाव) हे नऊ गट अनु. जातीसाठी तर सातेवाडी (अकोले), राजूर (अकोले), समशेरपूर (अकोले), बोटा (संगमनेर), बारागाव नांदूर (राहुरी), देवठाण (अकोले) हे सात गट अनुसूचित जमातीसाठी हे गट आरक्षण काढण्यापूर्वीच लोकसंख्येवर आरक्षीत करण्यात आले.
या आरक्षणा सोडतीनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुन्या सदस्यांची अडचण झाली असून काही ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे काठावर संधी मिळणार आहे. आरक्षणाची लढाईनंतर आता इच्छुक प्रत्यक्षात निवडणुकीच्या आरपारच्या लढाईसाठी सज्ज होणार आहे. या आरक्षण प्रक्रियेत उपजिल्हाधिकारी शारदा जाधव, तहसीलदार शरद घोरपडे, महसूल सहायक नीता कदम आणि वैशाली कळमकर सहभागी झाले. दरम्यान, सोमवारी काढण्यात आलेले आरक्षणाला मान्यता घेवून ते आज मंगळवार (दि.14) रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
अध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव
अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असून हा प्रवर्ग जिल्ह्यातील बोटा (संगमनेर), बारागाव नांदूर (राहुरी), देवठाण (अकोले) आणि सातेवाडी (अकोले) या गटासाठी आरक्षीत झालेला आहे. यामुळे या ठिकाणी निवडून येणार्या अनुसूचित जमातीच्या महिला या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत राहणार आहे. यासह ज्या महिलांकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असेल त्या देखील अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. यामुळे यावर ऐनवेळी कायद्याचा किस निघण्याची शक्यता आहे.
कोर्टात जाणार, सरकारचे धोरण दुटप्पी- कार्ले
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण हे नियमानूसार चक्रीय पध्दतीने होणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारने हे जाणीवपूर्वक रद्द करत नव्या पध्दतीने लोकसंख्येवर आधारीत आरक्षण काढले. या प्रकारामुळे अनेक ठिकाणी गटांचे आरक्षण झालेले आहे. यामुळे अनेक सदस्यांवर अन्याय झालेला आहे. या विरोधात कोर्टात धाव घेणार आहोत. कोर्ट यावर काय निकाल देईल हे माहित नाही. मात्र, आजच्या सोडविरोधात आमचा विरोध नोंदवून घ्यावा, अशी मागणी यावेळी माजी परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली. सोडतीनंतर त्यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
2002 ते 2022 चे गट पुन्हा आरक्षीत
जिल्हा परिषद आरक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मधील तरतूद 20 ऑगस्ट 2025 च्या नियमानूसार कलम 3, 4, 5 आणि 8 नूसार काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे अनेक मतदारसंघात खुल्या प्रवर्गासह राखीव प्रवर्गाला चक्रीयपध्दतीने आरक्षणाचा लाभ मिळू शकला नाही. तसेच यापूर्वी 2002 ते 2022 पर्यंत आरक्षीत असणारे गट पुन्हा आरक्षीत झालेले आहेत. यामुळे खुला, ओबीसी आणि अनुसूचित जाती- जमाती गटावर अन्याय झाल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.
अनेक दिग्गजांना स्वतः थांबून घरातील महिलेला पुढे करावे लागणार तर काहींना चालून आली संधी
- श्रीरामपूर – निमगावखैरी, निपाणी, बेलापूरातून ठरणार श्रीरामपूरचा नवा सभापती
– टाकळीभान गट-गणात येणार महिलाराज
– बेलापुरात खुल्या प्रवर्गातील महिलांमध्ये लढत रंगणार
– उंदिरगाव, पढेगावात अनेकांचे स्वप्न भंगले
– दत्तनगर गट व गण आरक्षित, अनेक मातब्बरांना धक्का - राहुरी – वांबोरी, उंबरे, मानोरीत राहुरीच्या नव्या सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच होणार
- नेवासा – नेवाशात खुल्या प्रवर्गाचा बोलबाला, तब्बल 8 ठिकाणी सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांत लढत
– कुकाणा, सलाबतपूर, देडगावातून ठरणार नेवाशाचा नवा सभापती
– डॉ. तेजश्री लंघे यांना यंदा संधी - संगमनेर – वडगावपान, घुलेवाडीतून होणार संगमनेरचा सभापती
– आश्वी, जोर्वेत खुल्या वर्गातील महिलांमध्ये लढत रंगण्याची चिन्हे
– तळेगाव, राजापुरात खुल्या प्रवर्गात चुरस - कोपरगाव – परजणे विरुद्ध कोल्हे; संवत्सर गट होणार ‘हॉट सीट’
– पोहेगावातून नितीन औताडेंपुढे पेच - राहाता – जुन्या आणि अनुभवी नेत्यांना आता कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवावे लागणार
– सावळीविहीर बु. (अनु.ज. महिला), साकुरी (अनु. जा. महिला), कोल्हार बु. (ना. मा.प्र. महिला) आणि पुणतांबा व दाढ बु. (सर्वसाधारण महिला) या पाच जागांमुळे विद्यमान पुरुष उमेदवारांची संधी हुकली
– साकुरीत महिलाराज येणार - श्रीगोंदा – काष्टी, बेलवंडीत जोरदार लढत होणार




