अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पातळीवर सर्वांना प्रतिक्षा असणार्या जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यात झेडपी सामान्य प्रशासन विभाग 6 पासून जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करणार असून 8 मे पर्यंत ती पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा पातळीवर बदल्या पूर्ण झाल्यावर 18 ते 22 मे या कालावधीत पंचायत समिती पातळीवरील कर्मचार्यांच्या बदल्या पूर्ण करण्यात याव्यात, असे आदेश काढण्यात आले आहेत.
यंदा जनगणनेची कार्यवाही करण्यात येणार येणार असल्याने जिल्हा परिषदेच्या वर्ग क व ड या प्रवर्गातील शिक्षक, ग्रामसेवक आणि जनगणेच्या कामासाठी नेमणूक झालेले कर्मचारी वगळून उर्वरित उर्वरित कर्मचार्यांची बदलीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करून ते प्रसिध्द केले आहे. यात 6 मे रोजी सकाळी सर्वप्रथम कृषी विभागातील कर्मचारी, त्यानंतर महिला बालकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, त्यानंतर दुपारी बांधकाम, शिक्षण, अर्थ आणि सायंकाळी सामान्य प्रशासन विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. तसेच दुसर्या दिवशी 7 मे रोजी सकाळी सर्वप्रथम पशूसंवर्धन विभाग, त्यानंतर आरोग्य विभाग तर 8 मे रोजी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करावी. प्रशासकीय व विनंती बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचार्यांची, तसेच बदली धोरणात सुट मिळावी यासाठी विनंती केलेल्या कर्मचार्यांची आवश्यक कागदपत्रांची खातरजमा संबंधीत विभाग प्रमुखांनी करावी. 31 मार्चअखेर मंजूर, भरलेली व रिक्त पदांचा अहवाल तसेच प्रशासकीय बदलीने रिक्त होणारी पदे बदल्यापूर्वी दोन दिवस आधी प्रसिध्द करण्यात यावीत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील रिक्त पदांचा अहवाल त्यात्या विभागाचे प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्यावर राहणार आहे.
अपंग कर्मचार्याच्या प्रमाणपत्रांची पडताळीणी तसेच संबंधीत प्रमाणपत्राची ऑनलाईन नोंद आहे की नाही, याची पडताळणी खाते प्रमुखांनी करावी, अशा सुचना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी केल्या आहेत. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्यास त्यास संबंधीत खाते प्रमुख गटविकास अधिकारी यांना व्यक्ती: जबाबदार धरण्यात येईल यांची गंभीरपणे नोंद घेवून बदली प्रक्रिया संपल्यावर तात्काळ इतिवृत्त व बदली आदेश त्याच दिवशी काढण्याचे सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले आहेत.





