Monday, May 6, 2024
Homeनगरपहिल्या टप्प्यात 29 पदांसाठी 2313 उमेदवारांची परीक्षा

पहिल्या टप्प्यात 29 पदांसाठी 2313 उमेदवारांची परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सन 2015 नंतर प्रथमच नगर जिल्हा परिषदेमध्ये नोकरभरती होत असून येत्या शनिवारीपासून (दि. 7) पहिल्या टप्प्यात 29 पदांसाठी 2313 उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.

- Advertisement -

सन 2015 नंतर जिल्हा परिषदेमध्ये नोकरभरती झाली नव्हती. सन 2019 मध्ये नोकरभरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र तो स्थगित करण्यात आला. आता 937 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 44 हजार 726 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत भरतीप्रक्रिया राबवली जात असून या कंपनीने पहिल्या टप्प्यात 29 पदांसाठी दि. 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दि. 7 ऑक्टोबर- वरिष्ठ सहाय्यक (लेखा, 7 पदे, 480 परीक्षार्थी) व रिंगमन, दि. 8- विस्तार अधिकारी (सांख्यिकी, 4 पदे, 520 परीक्षार्थी), दि. 10- विस्तार अधिकारी (कृषी, 1 पद, 603 परीक्षार्थी) व आरोग्य पर्यवेक्षक, दि. 10- लघुलेखक एक पद व कनिष्ठ सहाय्यक (लेखा 16 पदे, दोन्ही मिळून 720 परीक्षार्थी) असे वेळापत्रक असणार आहे. या परीक्षेसाठी नगर शहराजवळील छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालय, अचीवर्स इन्फोटेक (जामखेड रस्ता, टाकळी काझी, नगर), विश्वभारती अकॅडमी (सारोळा बद्दी, नगर), शुभम टॅलेंट (आनंदऋषी रुग्णालयाजवळ, नगर), श्रीगोंद्यातील सोनिया गांधी पॉलिटेक्निक महाविद्यालय व काष्टी येथील परिक्रमा महाविद्यालय येथे परीक्षा केंद्र आहेत. रिंगमन, आरोग्य पर्यवेक्षक यासारख्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू असली तरी ही पदे नगर जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाहीत. मात्र इतर ठिकाणच्या उमेदवारांसाठी नगरमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.

परीक्षार्थींना ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रातील अंतर्गत व्यवस्था ‘आयबीपीएस’ कंपनीकडे सोपवण्यात आली आहे तर बाह्य व्यवस्थेवर जिल्हा परिषदेचे अधिकारी नियंत्रण ठेवून असतील. प्रत्येक दिवशी सकाळी 8 ते 10, दुपारी 13 ते 2 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत परीक्षा घेतली जाईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षार्थींना केंद्रावर उपस्थित राहावे लागेल. तेथे त्यांची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाईल तसेच बायोमेट्रिक नोंदणी केली जाईल. हॉल तिकीट व्यतिरिक्त आधारकार्ड, पॅनकार्ड, पारपत्र, वाहन चालवण्याचा परवाना आदी स्वरूपाचे अतिरिक्त ओळखपत्र जवळ ठेवावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या