अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख विभाग पुणे येथील अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची वर्णी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्णी लागली आहे. तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांची बदली अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. साधारण सव्वातीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर 2018 च्या बॅचचे आयएएस अधिकारी येरेकर यांची बदली झाली होती. तेव्हापासून येरेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.
त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेत हजारो कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली होती. विशेष म्हणजे येरेकर यांना तीन वर्षापासून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेवर एक हाती काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्य नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेत एक हाती कारभार करता आला. यापूर्वी दोनदा सरकारकडून येरेकर यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते, यात पहिल्यांदा पुण्यात परिवहन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर त्यांची ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली होती, मात्र मंत्रालय पातळीवरून येरेकर यांच्या बदलीचे आदेश थांबवण्यात आले होते.
त्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून येरेकर यांच्या बदलीच्या आदेश निघणार याबाबत चर्चा होती. अखेर बुधवारी सायंकाळी राज्य सरकारच्या वतीने राज्यातील आठ आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. यात येरेकर यांच्या जागी पुण्याहून भूमी अभिलेख विभागातून आनंद भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येरेकर यांची पदोन्नतीने अमरावती जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
लंकेंशी संघर्ष तर पालकमंत्र्यांशी जवळीक
नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्याशी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्याशी एका प्रकारे घोषित संघर्ष झाला. मात्र या संघर्ष नंतरही न डगमगता येरेकर यांनी कामाचा धडाका सुरू ठेवला. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी येरेकर यांची जवळीक असल्याचे अनेक वेळा सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येरेकर यांचा मोलाचा वाटा होता. नगर सारख्या राजकीय व सामाजिकदृष्ट्या जागरूक असणार्या नगर जिल्ह्यात येरेकर यांनी तीन वर्ष यशस्वी काम केले.