धुळे | प्रतिनिधी- लाचखोरीत अडकलेल्या औषध निरीक्षकाच्या जळगाव आणि धुळे येथील घरांची एसीबीच्या पथकाने झडती घेतली. त्यात रोकडसह दागिने असा तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, औषध निरीक्षकासह पंटरची १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शिरपूरातील तक्रारदाराच्या तक्रारीवरून धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने काल औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यांच्यासह खाजगी इसम तुषार भिकचंद जैन या दोघांना आठ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. दोघांवर आझादनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एसीबीकडून औषध निरीक्षक देशमुख यांच्या जळगाव आणि धुळे येथील घरांची झडती घेण्यात आली. यात जळगाव येथील घरातून ३१ लाख ३० हजारांची रोकड, १७ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २२ हजार ७६० रुपयांची चांदी जप्त करण्यात आली. तसेच, धुळे येथील घरातून ७५ हजार ८१० रुपये रोख हस्तगत करण्यात आले.
या गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व धुळे विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी करीत आहेत.