धुळे | प्रतिनिधी- ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 9 पोलीस अंमलदारांचा आज सन्मान करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अंमलदारांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
गोपनीय माहिती संकलन, शोधपथकातील तपास, कायदा-सुव्यवस्था राखणे, वॉरंट बजावणी, वाहतूक नियंत्रण, गुन्हे उकल, मुद्देमाल व्यवस्थापन व डिजिटल अॅपद्वारे माहिती भरणे अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हे अंमलदार निवडण्यात आले. त्यात धुळे शहर, देवपूर, आझादनगर, चाळीसगाव रोड, मोहाडी, थाळनेर व शिंदखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सहभागी होते.
यांचा झाला सन्मान-‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ उपक्रमांतर्गत पोकॉ महेश मोरे (धुळे शहर) यांनी शोध पथकात न उघड गुन्ह्यांच्या तपासात व कायदा-सुव्यवस्थेच्या राखणीत मोलाची भूमिका बजावली. पोहेकॉ राकेश खांडेकर (आझादनगर) यांनी गोपनीय शाखेत कार्यरत राहून उत्कृष्ट जनसंपर्कातून संभाव्य राजकीय आणि सामाजिक घटनांची माहिती संकलित केली. पोकॉ भटेंद्र पाटील (देवपूर) यांनी प्रवासी महिलेची रिक्षात विसरलेली 5 लाखांची दागिन्यांची बॅग शोधून परत केली. पोहेकॉ विष्णू फुले (पश्चिम देवपूर) यांनी फेब्रुवारी महिन्यात 95 टक्के वॉरंट बजावणी केली. पोकॉ संदिप वाघ (चाळीसगाव रोड) यांनी गुन्हे तपासात अधिकाऱ्यांना सहाय्य व डायल 112 उपक्रमात जलद प्रतिसाद दिला. पोकॉ सचिन वाघ (मोहाडी) यांनी शोध पथकात नाउघड गुन्हे तपास व कायदा-सुव्यवस्था राखण्यात योगदान दिले. पोकॉ दीपक सैंदाणे (शहर वाहतूक शाखा) यांनी मार्चमध्ये मोटर वाहन कायद्यानुसार केसेस करून 6 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. पोहेकॉ हेमराज जाधव (शिंदखेडा) यांनी मुद्देमाल व्यवस्थित लावून त्याची वर्गवारी केली. पोकॉ रामकृष्ण बोरसे (थाळनेर) यांनी आयआरएडी अॅपमध्ये शंभर टक्के माहिती भरली.