धुळे | प्रतिनिधी- शहर वाहतूक पोलिस शाखेचे एपीआय भुषण कोते यांनी आज बुलेटस्वारांचा कर्णकर्कश आवाज बंद केला. ३५ वाहनधारकांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केेले असून ही कारवाई नेहमीच राबविण्याची गरजही व्यक्त केली आहे.
शहरात बुलेट वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून कानठळ्या बसविणार्या वाहन चालकांची संख्या मोठया प्रमाणात वाढलेली असून त्याचा बालक, वृध्दासह नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेत आज दि.२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजदरम्यान शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी शहरातील जयहिंद ज्युनिअर कॉलेज परिसर, दत्त मंदिर चौक, महाजन हायस्कुल, संतोषी माता चौक, बारापत्थर, मामलेदार कचेरी चौक या वर्दळीच्या ठिकाणी विशेष मोहिम राबवुन बुलेट वाहनांच्या सायलेन्सरची तपासणी करण्यात आली. त्यात एकुण ३५ वाहन धारकांनी त्यांचे वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविलेले आढळुन आले. या वाहन धारकांवर मोटर वाहन कायदा कलम १९८ प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वाहतुक नियमांचे पालन करा- यापुढे देखील कारवाई सुरुच राहणार असून शहरातील बुलेट वाहन धारकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे. आपल्या बुलेट वाहनातील सायलेन्सरमध्ये कोणताही अनावश्यक बदल करु नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भुषण कोते यांनी केले आहे.