नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज, १ नोव्हेंबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, ढाबे आणि केटरिंग व्यावसायिकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे, सलग वाढीच्या मालिकेमुळे व्यावसायिक गॅस वापरणाऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर महिन्यातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजीच्या किमती आणि आयात खर्चातील चढ-उतार यांचा परिणाम देशांतर्गत व्यावसायिक गॅसच्या दरांवर होत आहे. तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या दरांचा आढावा घेतला जातो
हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांच्या खर्चात वाढ
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, चहाची दुकाने, खानावळी, मिठाईची दुकाने आणि केटरिंग व्यवसायात केला जातो. आधीच अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल आणि अन्य वस्तूंच्या किमतीत चढ-उतार सुरू असताना गॅस दरवाढीमुळे व्यावसायिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.या वाढीव खर्चाचा परिणाम भविष्यात खाद्यपदार्थांच्या किमतींवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह ग्राहकांनाही याचा अप्रत्यक्ष फटका बसू शकतो.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे
व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाला असला तरी सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १ नोव्हेंबर रोजी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सध्याच्या दरानेच सिलिंडर उपलब्ध होणार आहे




