Sunday, November 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; 'महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

हजारो पणत्यांच्या लखलखाटात ‘महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून निघाला.राजमुद्रा सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दहाव्या अर्थात दशकपूर्ती दीपोत्सवाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘एक पणती शिवरायांसाठी’ या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्याने सामाजिक एकता, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर मिलाफ घडवून आणला.

सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिवतीर्थ) परिसरात झालेल्या या दीपोत्सवाचे यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेली आकर्षक दीपमांडणी. हजारो पणत्यांच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळा, भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि नाशिकच्या आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडविण्यात आले. हा देखणा दीपसोहळा पाहण्यासाठी सायंकाळपासून शिवतीर्थावर नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित रक्तदान शिबिराने झाली. नागरिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले. सायंकाळी सात वाजता मुख्य दीपोत्सवाचा शुभारंभ झाला. भव्य दीपप्रज्वलनानंतर पारंपरिक गोदा आरती, आकर्षक आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले. या सोहळ्यास सरदार विंचूरकर यांचे वंशज, नाशिकचे माजी महापौर व उपमहापौर, नाशिक विभागाचे धर्मादाय मुख्य सहआयुक्त तथा श्री त्र्यंबकेश्वर मंदिर व श्री सप्तशृंगी मंदिर, वणीगडचे अध्यक्ष, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष, प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर, जिल्हाधिकारी, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त, शाहू महाराज खैरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी राजमुद्रा सोशल फाऊंडेशनच्या गेल्या दहा वर्षांतील सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. राजमुद्रा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दशकभरात शिवजयंती, जिजाऊ जयंती, शंभूराजे जयंती, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेल्या या उपक्रमांची दशकपूर्ती दीपोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आली. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, हिंदू धर्मप्रसारक, मान्यवर तसेच राजमुद्रा सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा व अन्नधान्य पुरवठ्याचे प्रभावी नियोजन करा –...

0
नाशिक दि. २२ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा आणि गरजू नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक...