Sunday, November 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण,आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. आदर्श अंगणवाडी केंद्र तयार करून त्यात आधुनिक सुविधा देत बालकांना आनंददायी, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे. शासकीय जागेत विद्युत जोडणी उपलब्ध असलेल्या केंद्रांचा विचार करून ३,८३२ अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये विविध आधुनिक सुविधा आणि साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन सुविधा, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण याबाबींचा समावेश आहे.

अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येत असून बालकांच्या पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी अधिक गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5,500 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याची (Onion) 2,225...