येवला | प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील उंदीरवाडी येथील देशमुख वस्तीवर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरट्यांनी अंदाजे सुमारे साडे बारा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, उंदीरवाडी येथील देशमुख वस्तीवर स्नेहल रुषाल देशमुख (वय २७), त्यांची आई सिंधुबाई भास्कर सोनवणे आणि काकू कल्पना प्रदीप सोनवणे या घरात होत्या. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक फेरीवाला घराजवळून गेल्यानंतर काही वेळातच मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या.घरातील महिला पाठीमागील बाजूस धुणी-भांडी करण्यासाठी गेल्याची संधी साधून संशयितांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील बॅगेत ठेवलेले तसेच कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून दोघांनी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.




