नाशिक 14 (जिमाका वृत्तसेवा):
आदिवासी समाजातील तरुण-तरुणींच्या कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पिढीने शिक्षण, ज्ञान आणि कौशल्याच्या बळावर प्रगती साधावी. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साई श्रद्धा सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळातर्फे रामकुंड येथील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री झिरवाळ यांनी गोदा आरती व गोदा पूजनासाठी उपस्थिती लावली. कलाकार चेतन राऊत यांनी १ लाख ५१ हजार पणत्यांच्या माध्यमातून साकारलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या मोझेक प्रतिकृतीची त्यांनी पाहणी करून कौतुक केले. यावेळी दिंडोरी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अविनाश जाधव, लक्ष्मण सावजी, गोकुळ झिरवाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त ग्रामीण भागासह राज्यभर विविध ठिकाणी संयुक्त जयंती साजरी केली जाते. यानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये जयंतीच्या पूर्वसंध्येला असा कार्यक्रम आयोजित होणे ही अभिमानाची बाब आहे. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी अल्पवयातच आदिवासी समाजाला संघर्ष, स्वाभिमान आणि परिवर्तनाची दिशा दिली. आदिवासी समाजात सुशिक्षित पिढी निर्माण होणे आणि तरुणांनी विविध क्षेत्रांत प्रगती करणे आवश्यक आहे. आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, पहिल्या प्रयत्नात अपयश आले, तरी त्यांनी हार न मानता अखेर शिखर सर करून तेथे तिरंगा फडकविण्याचा मान त्यांनी मिळवला. अशा यशोगाथा इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतात. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना एकत्र आणून त्यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील गुणवंत खेळाडू, कलाकार, गिर्यारोहक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांच्या यशोगाथा समाजासमोर आल्यास अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. अशा प्रतिभावंतांना संधी देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम समाजाने आणि संस्थांनी करावे. यापूर्वी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबई येथे तीन दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यभरातील सांस्कृतिक उपक्रम, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि महिला बचत गटांच्या कार्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी नंदुरबारच्या प्रसिद्ध काठीच्या होळीची प्रतिमा नरिमन पॉइंट येथे सुमारे ४५ हजार दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. या कलाकृतीचे मुंबईकरांनी विशेष कौतुक केले होते. त्याच संकल्पनेतून नाशिकमध्ये भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा १ लाख ५१ हजार मातीच्या पणत्यांमधून साकारण्याची कल्पना पुढे आली.
कलाकार चेतन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने व मेहनतीने ही भव्य मोझेक प्रतिमा साकारली आहे. जागतिक स्तरावर दखल घेतली जावी, अशा दर्जाचे काम त्यांनी केले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री झिरवाळ यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत पेठसह इतर आदिवासीबहुल तालुक्यात ३६ वनराई बंधारे बांधणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचेही कौतुक केले. या बंधाऱ्यांमध्ये दोन ते तीन महिने पुरेल एवढे पाणी साठवले जात असून, त्याचा उपयोग वन्यप्राणी, पक्षी तसेच स्थानिक नागरिकांना होत आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याप्रमाणेच समाजाच्या हितासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे महत्त्वाचे आहे. यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाच्या प्रयत्नांना समाजानेही हातभार लावावा. शासनाच्या बरोबरीने नागरिकांनी पुढाकार घेऊन जलसंधारणासारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री . झिरवाळ यांनी करीत उपस्थित नागरिकांना भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.




