नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
बँकेच्या कामासाठी सोबत असलेल्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच विश्वासघात करत १४ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरीनंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी दोघांनी मोबाईलचे सिमकार्ड बदलून नांदेडसह विविध शहरांतून प्रवास केला. मात्र, अंबड पोलिसांनी चार पथके रवाना करून अखेर ठाणे शहरातून दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ लाख ५०० रुपयांची रोकड आणि ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन असा एकूण १४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
युनियन बँक ऑफ इंडिया, नाशिक सिटी शाखेशी संबंधित वैभव विश्वनाथ डोळे (४४, रा. गंगापूर रोड, नाशिक) यांनी याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास नाशिक महापालिकेच्या नवीन नाशिक विभागातून बँकेच्या कामासाठी नेण्यात येणारी रोकड दैनंदिन रोजगारावर असलेले सुरेश हिरामण सोनकांबळे आणि अनुप सुरेश कुमावत यांनी संगनमताने लंपास केली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विश्वासघात करून दोघांनी रोकड घेऊन पोबारा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ २ उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी गुन्हे शोध पथकाला तपासासाठी विशेष सूचना दिल्या.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अविनाश नडविनकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू केला. चोरीनंतर दोघांनी मोबाईलचे सिमकार्ड बदलून नांदेड गाठल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चार पथके रवाना करून त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. संशयित नांदेडहून शेगाव, तुळजापूर, गाणगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि तेथून ठाणे असा प्रवास करत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करीत होते.
अखेर पोलिसांनी सुरेश हिरामण सोनकांबळे (४०, रा. तुलसीधाम, धर्मवीरनगर, ठाणे) आणि अनुप सुरेश कुमावत (४१, रा. अजिंक्यतारा, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांना ठाणे शहरातील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता चोरीची कबुली मिळाली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली १४ लाख ५०० रुपयांची रोकड आणि चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी आणि पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, उल्हास गांगुर्डे, पोलीस शिपाई संजय सपकाळे, अनिल गाढवे, गणेश कोठुळे, फरीद ईनामदार, वैभव एखंडे, मयूर पवार, तुषार मते, प्रवीण राठोड, समाधान शिंदे, राव, सागर जाधव आणि मुंजाळ यांचा समावेश होता. दोघा संशयितांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर आणि पोलीस शिपाई वैभव एखंडे करीत आहेत.
सिमकार्ड बदलले; अनेक शहरांतून पोलिसांना गुंगारा
गुन्हा केल्यानंतर पोलिसांचा माग लागू नये, यासाठी संशयितांनी मोबाईलचे सिमकार्ड बदलले आणि थेट नांदेड गाठले. त्यानंतर नांदेड, शेगाव, तुळजापूर, गाणगापूर, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करीत ठाणे गाठले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सातत्याने ठिकाणे बदलणाऱ्या संशयितांच्या मागावर अंबड पोलिसांनी चार पथके रवाना केली होती. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अखेर ठाणे शहरातील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून दोघांना जेरबंद करण्यात आले.
रेकॉर्डवरील संशयित बँकेत कंत्राटी कर्मचारी कसा ?
अटक करण्यात आलेला संशयित सुरेश हिरामण सोनकांबळे हा पोलिसांच्या अभिलेखावरील संशयित असून, त्याच्याविरुद्ध २००८ मध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. असे असतानाही तो राष्ट्रीयीकृत बँकेच्या कामाशी संबंधित कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत कसा होता, त्याची नियुक्ती करताना आवश्यक पडताळणी करण्यात आली होती का, असे प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. बँकेच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना पार्श्वभूमी तपासणी किती गांभीर्याने केली जाते, याकडेही या घटनेने लक्ष वेधले आहे.




