
नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’- संपादक
काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये पाहायला मिळाले. नाशिकमध्ये पार पडलेले काँग्रेसचे ‘सृजन संघटन’ हे दहा दिवसांचे निवासी शिबिर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. या शिबिराने केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर राजकीय विश्लेषकांनाही काँग्रेसच्या बदलत्या आणि गंभीर कार्यपद्धतीची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
भारतीय राजकारणात सध्या अस्तित्वाची आणि विचारधारेची मोठी लढाई सुरू आहे. गेल्या काही वर्षांत निवडणुकांचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून, केवळ सभा आणि रॅली घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, हे सर्वच राजकीय पक्षांना उमगले आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे, याचेच एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये पाहायला मिळाले. नाशिकमध्ये पार पडलेले काँग्रेसचे ‘सृजन संघटन’ हे दहा दिवसांचे निवासी शिबिर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. या शिबिराने केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर राजकीय विश्लेषकांनाही काँग्रेसच्या बदलत्या आणि गंभीर कार्यपद्धतीची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेले हे ‘सृजन संघटन’ शिबिर म्हणजे केवळ कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्याचा सोपस्कार नव्हता, तर ती एक अत्यंत शिस्तबद्ध अशी निवासी कार्यशाळा होती. सलग दहा दिवस चाललेल्या या शिबिरात पक्षाचे राज्यभरातील तब्बल ७२ जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. देशभरात काँग्रेसने अशाप्रकारच्या शिबिरांचे एक महत्त्वाकांक्षी सत्र सुरू केले असून, नाशिकचे हे शिबिर देशातील अशा प्रकारचे नववे शिबिर ठरले आहे. या दहा दिवसांत विविध विषयांवरील तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्षांना सखोल मार्गदर्शन केले. पक्षाची ध्येयधोरणे, सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती, विरोधकांच्या अपप्रचाराला द्यायचे उत्तर आणि तळागाळातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी या शिबिरात विशेष मंथन झाले.
या शिबिराला पक्षाचे राज्यातील सर्व प्रमुख नेते हजर होते. विशेष म्हणजे, या संपूर्ण काळात उपस्थित शिबिरार्थी तसेच पक्षाच्या कोणत्याही नेत्यांना माध्यमांशी संवाद साधणे तर दूरच; पण मोबाईल वापरण्यासही बंदी असल्याने या शिबिरात प्रत्यक्षात नेमके काय चालले आहे, याची खबरबात कोणालाच मिळाली नाही. नाशिक शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गंगापूर धरणानजीकच्या एकांतात असलेल्या पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टवर हे शिबिर पार पडले. साहजिकच, तेथे सर्वसामान्यांना तर दूरच; पण माध्यमांनाही जाता आले नाही. ही खाशी व्यवस्थाच अशासाठी केली होती की, शिबिराच्या मुख्य उद्देशाला कोणताही धक्का लागणार नाही आणि उपस्थितांचे लक्ष विचलित होणार नाही.
या निवासी शिबिराचे सर्वात मोठे आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे नेत्यांना केवळ वातानुकूलित सभागृहात बसवून बौद्धिक देण्यावरच भर दिला गेला नाही, तर त्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवून ग्रामीण वास्तवाची जाणीव करून देण्यात आली. शिबिराच्या दहा दिवसांपैकी एक दिवस सर्वच ७२ जिल्हाध्यक्षांसाठी अत्यंत वेगळ्या धाटणीचा होता. या सर्व नेत्यांना प्रत्येकी एका गावात पाठवण्यात आले. तेथे त्यांनी केवळ भेट दिली नाही, तर रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) कामावर मजुरांसोबत प्रत्यक्ष काम केले. एवढेच नाही, तर त्या रात्री त्यांनी त्याच गावात मुक्कामही केला. वातानुकूलित गाड्या आणि कार्यालयांची सवय असलेल्या या नेत्यांना तळागाळातील मजुरांच्या व्यथा, त्यांचे कष्ट आणि ग्रामीण भागातील भीषण वास्तव अगदी जवळून अनुभवता आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अखेरच्या दिवशी एका ठिकाणी कुदळीने खोदकामाचा कार्यानुभव घेतला. या प्रत्यक्ष अनुभवानंतर प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपापल्या अनुभव आणि निरीक्षणांचे सविस्तर टिपण तयार करून देण्यास सांगण्यात आले होते. जनतेशी नाळ जोडण्यासाठी आणि त्यांच्या वेदना प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी काँग्रेसने उचललेले हे पाऊल संघटनात्मक बांधणीत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
राहुल गांधींचा ‘नो-शो ऑफ’ दौरा
या ऐतिहासिक शिबिराच्या समारोपासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी स्वतः नाशिकमध्ये दाखल झाले. मात्र, त्यांचा हा दौरा त्यांच्या किंवा इतर कोणत्याही मोठ्या नेत्याच्या नेहमीच्या दौर्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. राहुल गांधींनी या दौर्यात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, मेळावा किंवा रोड-शो घेतला नाही. त्यांनी माध्यमांशीही संवाद साधणे जाणीवपूर्वक टाळले. यामागचे मुख्य कारण म्हणजे, केवळ आणि केवळ संघटनेच्या प्रशिक्षणावर भर द्यायचा असल्याने इतर कशातही लक्ष घालायचे नाही, असा ठाम निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगितले जाते. या दौर्यात त्यांनी जेन झींचा मेळावा घ्यावा, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आदिवासी तरुणांच्या आंदोलनस्थळी भेट द्यावी अशा विविध मागण्यांसाठी प्रदेशच्या नेत्यांनी राहुल गांधींना गळ घातली होती; परंतु त्यांनी या सगळ्या मागण्यांना निग्रहाने दूर सारले. पण त्यांनी आणखी एक लक्षवेधी कृती केली.
गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणार्या आदिवासी ‘जेन झी’ तरुणांना मुद्दाम बोलावून घेतले आणि त्यांच्याशी विशेष संवाद साधला. आजचा तरुण वर्ग, विशेषतः आदिवासी भागातील तरुण कोणत्या समस्यांना सामोरा जात आहे, त्यांच्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या आकांक्षा काय आहेत आणि प्रस्थापित व्यवस्थेकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे राहुल गांधींनी अत्यंत बारकाईने समजून घेतले. यातून काँग्रेस पक्ष नव्या पिढीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचा संदेश गेला. तत्पूर्वी आदल्या दिवशी आदिवासींच्या मोर्चात पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून काँग्रेस पक्ष आदिवासींबरोबर असल्याचे कृतीतून दाखवून दिले होते. समारोपाच्या सत्रात राहुल गांधींनी सर्व जिल्हाध्यक्षांशी थेट आणि मोकळा संवाद साधला.
यावेळी त्यांनी नेत्यांना केवळ सत्ताकारणात न अडकता जनतेशी बांधिलकी बाळगण्याचा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचा कानमंत्र दिला. राहुल गांधींचा हा दौरा केवळ राजकीय पदाधिकार्यांपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी या शिबिरात उपस्थित असलेल्या जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशीही स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांच्या पुढील पिढीशी, विशेषत: युवांशी अत्यंत अनौपचारिक संवाद साधला. राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार्या आणि अनेक तडजोडी करणार्या त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या, भावना समजून घेण्याचा हा एक अत्यंत संवेदनशील राजकीय प्रयत्न होता. यामुळे पदाधिकार्यांमध्ये पक्षाविषयी एक भावनिक जवळीक निर्माण होण्यास मदत होईल.
राहुल गांधी नाशिकमध्ये आले आहेत हे समजल्यानंतर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची आस लागली होती. मात्र, राहुल गांधी ठरवलेल्या रूपरेषेबाहेर जाऊन कुणालाही न भेटल्याने या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी जरूर पसरली. परंतु जर या संपूर्ण प्रक्रियेकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले, तर ही नाराजी दुय्यम ठरते. या संपूर्ण शिबिराच्या आयोजनातून आणि राहुल गांधींच्या कृतीतून एक स्पष्ट आणि सकारात्मक संदेश गेला आहे. तो म्हणजे, काँग्रेस पक्ष आता स्वतःच्याच संघटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. केवळ दिखाऊपणा, वरवरची प्रसिद्धी किंवा क्षणिक उत्साहापेक्षा पायाभूत संघटना भक्कम करण्यावर पक्षाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्त्यांची थोडी नाराजी असली, तरी पक्षाने दाखवलेली ही शिस्त आणि बांधणीचे गांभीर्य काँग्रेससाठी एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. ङ्गसृजन संघटनफच्या माध्यमातून नाशिकमध्ये राबवला गेलेला हा शिस्तीचा आणि वास्तवाचे भान देणारा प्रयोग आगामी काळात काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर नक्कीच मोठी उभारी देईल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
अशाप्रकारची चिंतन शिबिरे ही खरे तर भारतीय जनता पक्षाची खासियत. त्यासाठी मुंबईजवळील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी यांच्या नावाने सुरू केलेल्या प्रबोधिनीत बारमाही प्रशिक्षणाची व्यवस्थाच भाजपने केलेली आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना तेथे नियमित प्रशिक्षण दिले जाते. भाजपच्या शिस्तीचा हाच संदेश काँग्रेसने गिरवावा, हे विशेष असले तरी कोणाचीही नक्कल करण्यापेक्षा काँग्रेसने त्यात स्वत:चा स्वतंत्र फॉर्म्युला तयार केल्याचे दिसते. गोरगरीब सामान्य जनता, दीनदुबळे, अल्पसंख्य समाज, आदिवासी हाच काँग्रेसचा कायम तारणहार ठरलेला मतदार वर्ग आहे. अलीकडच्या काळात या सर्वच मतपेढ्यांवरही भाजपने अत्यंत शिस्तबद्धपणे प्रभाव मिळविल्याने काँग्रेसला आपली ही मतपेढी पुन्हा मिळविणे गरजेचे ठरले आहे. त्याच दृष्टीने त्यांनी सृजन संघटनाची आखणी केलेली दिसते. एकीकडे भपका, दिखाऊपणा टाळून राहुल गांधी अत्यंत साधेपणाने या सर्वच उपक्रमाकडे पाहत असताना त्यांच्या आगमनाप्रसंगी भाजपने त्यांच्याविरोधात केलेले आंदोलन हास्यास्पद ठरले.
भाजपच्या महिलांनी काळ्या साड्या घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केले. महिला विधेयकाला विरोध करणार्या राहुल गांधींचा निषेध करीत, ‘गो बॅक राहुल गांधी’ अशा घोषणा या महिलांनी दिल्या. परंतु या आंदोलनाच्या स्थळापासून गांधी किमान पंधरा ते वीस किलोमीटर दूर अंतरावर शांतपणे आपल्या कार्यक्रमात मग्न होते. अशावेळी या आंदोलनाने काय साधले, असा प्रश्न अनेकांना पडला. शिबिराच्या ठिकाणी हे आंदोलन केले असते तरी एकवेळ समजून घेता आले असते. शिवाय महिला आरक्षणाच्या विधेयकाचे गुपित आता सर्वसामान्यांनाही कळालेले असताना त्या मुद्यावरून असे आंदोलन करणे केवळ हास्यास्पदच नव्हे तर गांधींच्या मागे फरफटणे झाले. अलीकडे अनेकदा राहुल गांधी एक कृती करतात आणि भाजपच्या नेत्यांना त्यामागे प्रतिक्रियेसाठी जावे लागते. ही अत्यंत सूचक अशी राजकीय दिशा आहे. गेली बारा वर्षे भाजप बोले अन् सगळे पक्ष हाले अशी स्थिती राहिली आहे. भाजपने एखादे नॅरेटिव्ह सेट केले की त्या सापळ्यात विरोधकांना नेमकेपणाने अडकवून त्यांची शिकार करणे हा भाजपचा अत्यंत आवडता उद्योग झाला होता.
जंतरमंतरवरील जेन झीच्या अभूतपूर्व आंदोलनानंतर मात्र भारतीय राजकारणाचा सगळा कॅनव्हासच बदलून गेला आहे. चक्क मोदी साहेबांनाही जेन झीची दखल घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मंत्र्यांची टीम तयार करून विद्यापीठांमध्ये त्यांना पाठवत तरुणांचे मन जाणून घेण्याची गरज भासावी, यातच भारताच्या बदलत्या राजकीय भवितव्याची पायवाट स्पष्ट होऊ लागल्याचे दिसते. गेल्या दशकाहून अधिक काळ भाजपने राहुल गांधी यांची पप्पू ही प्रतिमा अत्यंत प्रभावीपणे जनमानसावर ठसविली. आजही काही प्रमाणात त्याचा प्रभाव असला तरी राहुल गांधी यांनी त्यावर कधीच चकार शब्दानेही प्रतिक्रिया न देता, हजारो किलोमीटर देशव्यापी पदयात्रा करून प्रथम देश समजून घेतला.
नंतर ते सगळ्याच प्रश्नांना थेट भिडले. पत्रकारांना कधी चुकविले नाही. परदेशातील विविध नामवंत विद्यापीठात त्यांना खास भाषणासाठी बोलविले जाऊ लागले, तेथेही त्यांनी अभ्यासूपणे चर्चा केली. आजही ते मुक्तपणे लोकांमध्ये मिसळतात. पुणे येथील तरुणींच्या छात्रों की गुंज या मेळाव्यात तर त्यांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व न भूतो .. असा होता. तेथेही राहुल गांधी तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेले पाहावयास मिळाले. एकूणच, राहुल गांधींचा राजकीय प्रवास हा ‘पप्पू पास हो गया’ इथपर्यंत झाला आहे. कालाय तस्मै नम:
मो. ९३२५३८३०९२




