मुंबई | Mumbai
मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने पोलिस आणि दहशतवादीविरोधी पथकाच्या तपासाला मोठा झटका मानला जात आहे.
या निकालाच्या निमित्ताने २००६ सालच्या भीषण स्फोटाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. या स्फोटांच्या मालिकेत २०९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० पेक्षा जास्त जण या बॉम्बस्फोटात जखमी झाले होते. हा मुंबईच्या इतिहासातील काळा अध्याय ठरला होता. मुंबईच्या ईतिहासातील दुसरा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. मुंबईला हादरून सोडणारा हा हल्ला नेमका कसा घडला होता? त्यादिवशी लोकलमध्ये नक्की काय घडले होते? पाहूयात..
एका मागोमाग एक झालेल्या बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरले पण अनेक कुटुंबांचेही आधारस्तंभ हिरावून घेतले. पश्चिम रेल्वेच्या माहिम ते मिरारोड स्थानकांदरम्यान ११ मिनीटांत हे बॉम्बस्फोट झाले. प्राथमिक तपासात हे बॉम्ब फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये ठेवल्याचे निदर्शनास आले होते. या हल्ल्यासाठी ‘प्रेशर कुकर बॉम्ब’चा वापर करण्यात आला होता.पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा संघटनेने हे स्फोट घडवून आणले होते. या स्फोटांसाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता.
या स्थानकांदरम्यान झाले स्फोट
११ जुलैला मुंबईकर नेहमीप्रमाणे आपापल्या कार्यालयांमधून घरी जाण्यासाठी निघाले होते. पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन्समध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. सगळ्यात पहिला स्फोट ६ वाजून २४ मिनिटांनी झाला तर शेवटचा स्फोट ६ वाजून ३५ मिनिटांनी झाला. हे स्फोट इतके शक्तिशाली होते की, ट्रेनच्या डब्याच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या होत्या. पहिला स्फोट 6.24, दुसरा स्फोट 6.24, तिसरा स्फोट 6.25, चौथा स्फोट 6.26, पाचवा स्फोट 6.29, सहावा स्फोट 6.30 आणि सातवा स्फोट 6.35 मिनिटांनी झाला होता. यापैकी तीन स्फोट वांद्रे-खार रोडदरम्यान, मिरारोड भायंदर आणि माटुंगा रोड- माहीम या स्थानकांदरम्यान झाले होते. तर तीन स्फोट हे लोकल ट्रेन माहीम, जोगेश्वरी आणि बोरिवली स्थानकातून निघताना झाले होते. हे बॉम्ब बनवण्यासाठी आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. तसेच हे बॉम्ब गोवंडीत तयार करण्यात आले होते. यादरम्यान पाकिस्तानातून आलेल्या काही लोकांनीही त्यात मदत केल्याची माहिती तपासात समोर आली होती.
बॉम्ब बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर
हे बॉम्ब प्रेशर कुकरमध्ये स्फोटके भरून तयार केले केले होते. ज्यामुळे स्फोटाचा प्रभाव अधिक वाढला आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. यासाठी दहशतवाद्यांनी बॉम्बमध्ये आरडीएक्स, अमोनियम नाईट्रेट, फ्यूएल ऑईल आणि खिळ्यांचा वापर करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या लोकल ट्रेन्समध्ये हे प्रेशर कुकर बॉम्ब टाईमर सेट करुन ठेवून दिले होते. दहशतवादी हे बॉम्ब ट्रेनमध्ये ठेऊन खाली उतरले. त्यानंतर ठरलेल्या वेळी या बॉम्बचा स्फोट झाला होता. स्फोटानंतर ढिगाऱ्यात प्रेशर कुकरची हँडल्स मिळाली होती. त्यावरुन या सगळ्याचा उलगडा झाला होता.
बॉम्बस्फोटाचे पाकिस्तानमध्ये कनेक्शन
तत्कालीन तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटांचा कट पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा यांनी मिळून रचला होता. तसेच, भारतातील सिमी या संघटनेचे सदस्यही यात सामील होते. इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळ याने या स्फोटांची योजना आखली होती, असेही नंतरच्या तपासात समोर आले.
या बॉम्बस्फोटात सर्वाधिक मृत्यू माहिम येथे झाले होते. ही लोकल ट्रेन चर्चगेट ते बोरिवली अशी होती. या ट्रेनमधील ४३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात तब्बल २०९ निष्पाप लोकांनी आपला जीव गमवला होता. तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण मुंबई शहर हादरले होते.
न्यायालयाचा निकाल
२००८ साली या घटनेच्या पार्श्वभूमीवर सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचे नावही समोर आले होते. पोलिसांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळने हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची कबुली तिघांनी दिली होती. त्यानंतर भटकळलाही अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात जून २००७ साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि १९ ऑगस्ट २०१४ रोजी पूर्ण झाली.
सुनावणीदरम्यान फेब्रुवारी २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवर स्थगिती आणली. कमाल अंसारी या आरोपीने मकोका कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले होते. त्यानंतर २३ एप्रिल २०१० रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू करण्यात आली.
दहशतवादविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला गेला ज्यात अनेक संशयितांना अटक केली होती. या प्रकरणी सप्टेंबर २०१५ मध्ये, विशेष मोक्का न्यायालयाने या प्रकरणात १२ आरोपींना दोषी ठरवले. त्यापैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. पण आज सोमवारी २१ जुलै २०२५ रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की “केसमध्ये सादर केलेले पुरावे विश्वसनीय नव्हते” आणि “अनेक साक्षीदारांची साक्ष संशयास्पद होती”.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





