Sunday, July 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : नाशिक 'खड्ड्यात', नेते 'फोडाफोडीत' व्यस्त!

राज-का-रण : नाशिक ‘खड्ड्यात’, नेते ‘फोडाफोडीत’ व्यस्त!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

नाशिकमधील ‘ऑपरेशन टायगर-३’ चे वास्तव येत्या काळात समोर येईलच; मात्र अशाप्रकारच्या चर्चांमुळे राजकारणाची खालावलेली पातळी पुन्हा एकदा अधोरेखित होते. नेत्यांनी पक्षांतर्गत मतभेद आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून जनतेने ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले आहे, त्या विश्वासाला जागणे गरजेचे आहे. अन्यथा हा वारंवार होणारा विश्वासघात पाहून मतदार लोकशाही प्रक्रियेपासून दुरावल्यास नवल वाटायला नको. नाशिककरांना आता ‘ऑपरेशन्स’ नको, तर शहराचा रखडलेला ‘विकास’ हवा आहे.

हस्थाच्या नावाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा पहिल्या पावसातच बाजार उठल्याने महायुतीचे सहानुभूतीदार मतदारही अस्वस्थ झाले असताना, या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर-३’ची चर्चा सुरू झाली हा काही योगायोग खचितच नाही. शिवसेना (शिंदे गट) नाशिकमध्ये ‘ऑपरेशन टायगर-३’ या मोहिमेअंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या किमान १२ ते १४ नगरसेवकांना आपल्या गळाला लावणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. सध्याचे राजकारण काहीही घडू शकते, या ठाम विश्वासावर चालू लागल्याने या वावड्यांचीही दिवसभर चर्चा होणे स्वाभाविक आहे. हल्ली राजकारणात अनुभवाच्या तर्कांनाही काही अर्थ राहिलेला नसल्याने हे असे होणारच नाही, यावर विश्वास ठेवता येत नाही; तसेच असे होईल, असेही ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळेच अशी आवई उठवून दिली की, त्यातून उठणार्‍या तरंगाची एकतर मजा घ्यायची किंवा सहजच कोणी गळाला लागत असेल तर त्याला उचलायचे असेही होऊ शकते. त्यामुळेच ही बातमी पेरल्यानंतर त्याच्या संभाव्य परिणामांची उगवण सुरू झाली आहे.

भले पावसाने विलंब केल्याने शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. पण इकडे राजकारणाच्या शेतात मात्र पक्ष फोडण्याची मशागत उत्तम झालेली असल्याने काहीही पेरले तरी काहीतरी उगवणारच, याची खात्री वाटू लागली आहे. परवाच्या या फुटीच्या पेरलेल्या बातमीचेही तसेच झाले. गेले दोन दिवस केवळ नाशिकच नाही तर राज्यभर सध्या तीच चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वी, म्हणजे आदल्याच दिवशी याच ठाकरे गटाच्या सर्वच्या सर्व पंधरा नगरसेवकांनी सत्तारुढ भाजपच्या कारभाराविरोधात जोरदार आवाज उठविला होता, हे येथे लक्षणीय आहे. अर्थात, निष्ठेचे असे काही तर्क गेल्या काळात अनेक आमदार-खासदारांनी खुंटीला टांगून ठेवल्याने हे नगरसेवक फुटतील, असेच गृहीत धरले गेले.

परिणामी ठाकरे गटात हलकल्लोळ तर माजलाच शिवाय मुंबईहून तातडीने डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांना पाचारण करावे लागले. बरीच पडझड झाली तरी राहिले ते मावळे अन् उडाले ते कावळे ही ठाकरेंची भूमिका कायम असल्याने जे निष्ठेने राहिलेले आहेत, त्यांचीही धाकधूक वाढली असल्यास नवल नाही. अर्थात, ठाकरे गटाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून, हे केवळ हवेत सोडलेले बाण असल्याचे म्हणत या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मात्र, या संपूर्ण घडामोडींमागे असणारी पक्षांतर्गत धुसफूस आणि मतदारांच्या विश्वासाचा होत असलेला खेळ आता जनतेसमोर येऊ लागला आहे.

एकीकडे, शिंदे गटाकडून ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे दावे केले जात असतानाच, दुसरीकडे हे ‘ऑपरेशन’ म्हणजे शिंदे गटातीलच दोन स्थानिक गटांमधील अंतर्गत संघर्षाचा आणि वर्चस्ववादाचा परिपाक असल्याचेही बोलले जात आहे. स्वतःच्या गटाचे वजन वाढवण्यासाठी आणि वरिष्ठांसमोर आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी अशा स्वरुपाच्या चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात असल्याची शयता नाकारता येत नाही. विद्यमान सत्तेत सगळीच लाभाची पदे ही एकेका वर्षासाठी राहतील, असा फॉर्म्युला तयार केला गेला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच काहींनी आपली पदे शाबूत राहण्यासाठी ठाकरेंची काही माणसं आम्ही घेऊन येतो, पद कायम ठेवा, असा काहीतरी फंडा काढल्याचे सांगितले जाते.

ही माणसं कोण असतील, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. महापालिकेत तर सर्वांनाच अशा पुड्या सोडणार्‍या पुढार्‍यांची माहिती आहे. खरे तर अद्याप स्वीकृत नगरसेवक, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता अशी सगळीच महत्त्वाची अन् लाभाचीही पदे रिक्त असताना व ती कधी भरली जातील याची कोणतीही लक्षणं दिसत नसताना हा मध्येच ऑपरेशनचा विषय कसा उपटला, असा सवाल काही जाणकार पुढारी करीत आहेत. अशातच, आधीच शिंदेंच्या शिवसेनेत सगळे काही आलबेल नाही. भाजपमध्येही सगळं काही सुरळीत आहे, अशातला भाग नाही. दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर, शाहू खैरे, विनायक पांडे, गुरुमित बग्गा आदी मातब्बर ज्येष्ठ नगरसेवकांची हाताची घडी तोंडावर बोट ही अवस्था किती दिवस राहणार, असाही प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे ही अस्वस्थता खरे तर विरोधी पक्षांपेक्षाही सत्तारुढ भाजप व शिवसेनेतच अधिक असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते.

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची सक्रिय आक्रमकता लक्षणीय ठरत असली तरी त्यामुळे अस्वस्थ झालेले वा दुखावले गेलेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शिवसेनेतील दोन-तीन गटांच्या एकमेकांवरील कुरघोड्या लपून राहिलेल्या नाहीत. मध्यंतरी तर त्यावरून खा. श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचेच कान उपटले होते. ज्येष्ठे नेते उदय सामंत यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देऊन हे पेल्यातील वादळ तेथेच शमेल अशी व्यवस्था केली होती. परंतु विधान परिषदेत पक्षाचा दारूण पराभव झाल्याने हे वादळ शमले तर नाहीच; पण ते घोंघावतेच आहे याची स्पष्ट जाणीव झाली. ऐन निवडणुकीतही त्याचे दर्शन झाल्याने साक्षात नेत्यांनीच लक्ष घालत काही लोकांना जमालगोटा द्यावा लागला होता. परंतु गोकुळ गिते यांना लागलीच पक्षात घेत सामंत यांनी अत्यंत तडफेने पावले उचलीत हे वादळ पेल्यातच राहील याची काळजी घेतली खरी; पण प्रत्यक्षात ते वादळ सक्रिय आहे, हे उघड झाले.

वादळं ही अल्पकाळ शांत होऊ शकतात; पण पुन्हा एकदा जर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की त्याच वादळाला उसळायला दिशा मिळते, हा निसर्गनियम आहे. सध्या शिंदे गटात तसेच काहीसे झाल्याचे दिसते. सत्तेत असूनही सत्तेचे लाभ फारसे पदरात पडत नसल्याने आलेली अस्वस्थता यामागे जशी आहे, तशीच सत्तासंघर्षात आपण मागे पडता कामा नये ही सुप्त भावनाही प्रबळ होत चालली आहे. अर्थात, राजकारण हे सध्या एवढे लवचिक झाले आहे की कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नसल्याने शय ते करीत राहायचे व आपले स्थान भक्कम करायचे, अशी नवी पद्धत सध्या विकसित होत चालली आहे. ऑपरेशन टायगर-३ हा विषय त्याचाच एक भाग असावा. कारण या नाटकाला दुसरी बाजूही आहे. ठाकरे गट वरकरणी सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करीत असला, तरी त्यांच्या गटातील अनेक पक्ष बदलून आलेला एक नेता सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याची खात्रीलायक चर्चा आहे. जर हा बडा नेता खरोखरच नाराज असेल, तर भविष्यात त्याच्या समर्थकांना गळाला लावून शस्त्रक्रिया केली गेल्यास नाशिकच्या राजकारणाला आणखी एक कलाटणी मिळू शकते, हे नाकारता येत नाही.

नाशिकमधील ‘ऑपरेशन टायगर-३’ चे वास्तव येत्या काळात समोर येईलच; मात्र अशाप्रकारच्या चर्चांमुळे राजकारणाची खालावलेली पातळी पुन्हा एकदा अधोरेखित होते. नेत्यांनी पक्षांतर्गत मतभेद आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून जनतेने ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले आहे, त्या विश्वासाला जागणे गरजेचे आहे. अन्यथा हा वारंवार होणारा विश्वासघात पाहून मतदार लोकशाही प्रक्रियेपासून दुरावल्यास नवल वाटायला नको. नाशिककरांना आता ‘ऑपरेशन्स’ नको, तर शहराचा रखडलेला ‘विकास’ हवा आहे.

आगामी सिंहस्थाचे बिगुल वाजले असतानाच शहरातील राजकीय वातावरण ‘ऑपरेशन टायगर-३’ मुळे चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाने वरकरणी आमचा एकही वाघ जाणार नाही, असा दावा करत या चर्चा फेटाळल्या असल्या, तरी पडद्यामागे बरेच काही शिजत असल्याचे चित्र आहे. मात्र, या सगळ्या ‘राजकीय सर्कशी’त नाशिकची जनता मात्र पुरती होरपळून निघत आहे. नेत्यांची ही फोडाफोडी आणि ऑपरेशन्स एका बाजूला सुरू असताना, नाशिक शहराची अवस्था पाहवत नाही अशी झाली आहे. ‘स्मार्ट सिटी’ आणि विकासकामांच्या नावाखाली संपूर्ण नाशिक शहर सध्या खोदून ठेवण्यात आले आहे. त्यातच सध्या पावसामुळे या खोदलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

चिखलाचे साम्राज्य, रस्त्यांवर पडलेले भलेमोठे खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी यामुळे नाशिककर कमालीचे त्रस्त आहेत. लहान मुले, वृद्ध आणि नोकरदारांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. आम्हाला खड्डेमुक्त रस्ते आणि मूलभूत सुविधा देण्याऐवजी, नेतेमंडळी केवळ ‘ऑपरेशन्स’ करण्यात कशी काय व्यस्त राहू शकतात? असा संतप्त सवाल सामान्य नाशिककरांच्या मनात आहे. अयोध्येतील राममंदिरातील लूट तसेच मध्य प्रदेशातील जमीन घोटाळे उघड झाल्याने यावरून देशभर भाजपच्या ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेलाच सुरुंग लागला आहे.

या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच अशा ‘फोडाफोडी’च्या चर्चा घडवून आणल्या जातात का? असा संशय आता मतदारांना येऊ लागला आहे. मतदारांनी ज्या विचारसरणीवर आणि विश्वासावर निवडून दिले, त्या विश्वासाचा बाजार मांडला जात आहे. शहराला आलेले भकासपण, वाहतूककोंडी, वाढती गुन्हेगारी, बड्या धेंडांचे चोचले याचबरोबर रखडलेला विकास यावर चर्चा करण्याऐवजी संपूर्ण राजकीय ऊर्जा ‘कोण कोणाकडे जाणार’ याच गणितांमध्ये खर्च होत असल्याने जनतेमध्ये लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे..

‘ऑपरेशन’ जनतेच्या जखमेवर मीठ!
नाशिकमधील ‘ऑपरेशन टायगर-३’ यशस्वी होणार की फुसका बार ठरणार, हे लवकरच स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वीच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अभूतपूर्व निष्ठेच केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात कौतुक झाले, त्याच वाजेंच्या पक्षात पुन्हा एकदा निष्ठेच्या चिंधड्या उडविल्या जातात का ते पाहावयाचे. तसे काही झालेच तर सध्याच्या परिस्थितीत हे राजकीय नाट्य म्हणजे नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. नाशिककरांना सध्या नेत्यांची ‘फोडाफोडी’ किंवा पक्षांची ‘ऑपरेशन्स’ नको आहेत, तर त्यांना सुरक्षित रस्ते, खड्ड्यांतून मुक्ती आणि शहराचा प्रामाणिक विकास हवा आहे. जो पक्ष किंवा नेता जनतेच्या या अस्वस्थतेची दखल घेईल, त्यांचीच भविष्यात चलती राहील, हे मात्र निश्चित.

मो. ९३२५३ ८३०९२

ताज्या बातम्या

Eknath Khadse : अमित शाहांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली, पण…;...

0
मुंबई | Mumbai राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या (BJP Entray) चर्चांनी काही दिवसांपूर्वी...