Tuesday, August 11, 2026
HomeनगरAhilyanagar : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शिंगणापूरमध्ये पार्किंगची पर्यायी व्यवस्था

Ahilyanagar : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शिंगणापूरमध्ये पार्किंगची पर्यायी व्यवस्था

नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश || घोडेगाव एमआयडीसीमध्ये पर्यायाची चाचपणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात याव्यात. तसेच भाविकांची वाहतूक, वाहनतळ, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचे योग्य नियोजन करण्यात यावेत. शिर्डी आणि शिंगणापूर या ठिकाणी येणार्‍या भाविकांसाठी पार्किंगची पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केल्या आहेत.

- Advertisement -

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे प्रस्तावित विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत चौंडी, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील विविध विकास कामांचे नियोजन, प्रस्तावित कामांची सद्यस्थिती आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित विविध कामांचा तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित विकासकामांचा जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. स्मृतीस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नियोजन करून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. प्रस्तावित आराखड्यासाठी आवश्यक जागा भूसंपादित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.

नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. भाविकांची वाहतूक, वाहनतळ, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचे योग्य नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. संभाजीनगर तसेच नगर जिल्ह्यातून शिर्डी व शनिशिंगणापूरकडे येणार्‍या भाविकांसाठी आवश्यक पार्किंगची जागा निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.

घोडेगाव एमआयडीसी परिसरात पार्किंगसाठी किती जमीन उपलब्ध होऊ शकते, तसेच त्या ठिकाणी किती वाहनांची पार्किंग क्षमता निर्माण करता येईल, याची प्रत्यक्ष खातरजमा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिर्डीतील रस्त्यांची कामे वेळेवर पूर्ण करा
शिर्डी नगरपरिषद अंतर्गत शहरातील रस्त्यांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या इतर विकास कामांचीही पाहणी करून त्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : धीरज परदेशी हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत- परदेशी यांच्या निर्घृण हत्येने संतप्त झालेल्या नागरिकांचा आक्रोश सोमवारी रात्री रस्त्यावर पाहायला मिळाला. आरोपींना...