कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव शहरात मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणारा एक डंपर रंगेहाथ पकडत पोलिसांनी तब्बल 25 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाची कडक अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक विशेष पथक तयार करून कोपरगाव परिसरात गस्तीसाठी रवाना केले होते.
रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, प्रज्वल शरद भालेराव (वय 22, रा. खडकी, ता. कोपरगाव) हा तरुण सांगवी रोडकडून टाकळी फाटा मार्गे विनापरवाना डंपरमध्ये वाळूची अवैध वाहतूक करत आहे. या पक्की माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकळी फाटा येथे तातडीने सापळा रचला. काही वेळातच एक डंपर तेथे आल्यावर पोलिसांनी तो अडवला आणि वाहन चालकाची कसून चौकशी केली. चालकाकडे वाळू वाहतुकीच्या अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.
पोलिसांनी तत्काळ आरोपी प्रज्वल भालेराव यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विना क्रमांकाचा डंपर आणि 60 हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण 25 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सतीष भवर व प्रकाश मांडगे यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.




