श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांच्या हत्येला एक महिना उलटूनही मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेली नसल्याने दुबैय्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. हत्येमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन संघटित गुन्हेगारीचे संपूर्ण जाळे उघड करावे, तसेच संबंधित आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी 15 ऑगस्टपासून गांधी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दुबैय्या कुटुंबियांनी दिला आहे. आकाश दुबैय्या यांचे वडील शेखर दुबैय्या व चुलते कैलास दुबैय्या यांनी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. 11 जुलै रोजी नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायण येथे जेवणाच्या वादातून आकाश दुबैय्या यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर शहर व तालुक्यात चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. संघटित गुन्हेगारीच्या मुद्द्यावर विविध क्षेत्रांतील नागरिकांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
आकाश हा आमच्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. आम्ही व्यापारी आहोत, गुन्हेगार नाही. केवळ काही आरोपींना अटक करून प्रकरण संपवू नये. हत्येमागील सूत्रधार कोण आहे, आरोपींना कोणाचे पाठबळ आहे आणि संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत, याचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी भूमिका शेखर दुबय्या यांनी मांडली. शहरातील एका प्रमुख गुन्हेगाराचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंध असल्याचा आरोप शेखर दुबैय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. हा आरोप संबंधितांकडून खोडला जाऊ शकतो, असे स्पष्ट असतानाच, गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. राजकीय संरक्षण मिळत असल्यास त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दुबैय्या कुटुंबीय भाजपमध्ये कार्यरत असल्याचे सांगत, पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरणात थेट लक्ष घालून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आकाश दुबैय्या यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवावा, अशी मागणीही कुटुंबियांनी केली. आमच्या नातवाने वडील कुठे आहेत, असा प्रश्न विचारल्यावर त्याला काय उत्तर द्यायचे? असा भावनिक सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला. येत्या 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10.10 वाजता गांधी चौकात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे. हत्येचा सखोल तपास, मुख्य सूत्रधाराचा शोध, संघटित गुन्हेगारीचे जाळे उघड करणे, मोक्का कायद्यान्वये कारवाई आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविणे या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही दुबैय्या कुटुंबियांनी दिला आहे.
‘राजकारणात यांना चांगले लोक नकोय’
आम्ही दुबैय्या बंधू गेल्या आठ वर्षापासून भाजप सोबत आहोत. श्रीरामपुरात हिंदूच हिंदूंचे बळी घेत आहेत. असे असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या गंभीर प्रश्नाकडेे दुर्लक्ष करीत आहेत. श्रीरामपुरात एका हिंदू व्यावसायिकाच्या मुलाची हत्या होवूनही शिंदे सेनेकडून अद्याप आरोपीवर पक्षातून काढून टाकण्याची कोणतीही कारवाई झालेली नाही. याचा अर्थ यांना राजकारणात चांगले लोक नको आहेत. तर मग गुंड आणायचे आहेत का? असा सवालही दुबैय्या यांनी या पत्रकार परिषदेत केला.




