पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१२) श्री शुक्ल यजूर्वेदिय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या विचारविनिमय बैठकीत माजी महापौर दशरथ पाटील आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यात नियोजनाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. तसेच या बैठकीत सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात आली, रामकुंडावरील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान आगामी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:०२ वाजता होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनाची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी विशद केली. मात्र, नियोजनाच्या मुद्द्यावरून माजी महापौर दशरथ पाटील यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. बैठकीत दशरथ पाटील बोलायला उभे राहिले असता महापौर आणि आयुक्त आपापसात काही तरी बोलत होत्या त्यावर ते संतापून “मी अनेक कुंभमेळे पाहिले असून असा गलथान कारभार कधीही पाहिला नाही,तुम्हाला हिंदू धर्माच महत्व नाही” असे म्हणत त्यांनी आयुक्तांना धारेवर धरले. यावर आयुक्त खत्री यांनी सडतोड उत्तर देत, “तुम्ही मला धार्मिक भावनांच्या बाबतीत सांगू नका, कारण काही मंदिरे पाडण्याबाबत तुम्ही स्वतः अर्ज केलेला आहे,” असा प्रत्याघात केला. दोन्ही बाजूंनी वाद चिघळत असतानाच पंचवटी भाजप मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी मध्यस्थी करत हस्तक्षेप केला आणि वाद शांत केला.
रामकुंडावरील प्रलंबित विकासकामे ध्वजारोहणापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. सध्या रामकुंडावरील जुने शौचालय पाडल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी तात्काळ पर्यायी आणि तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता गृहांची व्यवस्था उभारण्याची मागणी मान्य करण्यात आली.
काँग्रेस शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी याप्रसंगी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “हा सोहळा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून संपूर्ण हिंदू धर्माचा आणि नाशिककरांचा आहे. त्यामुळे सर्व पक्ष आणि नागरिकांना यात सन्मानाने सामावून घेतले पाहिजे.” उपस्थित साधुसंत आणि सामाजिक-धार्मिक कार्यकर्त्यांनीही हा कुंभमेळा संपूर्ण नाशिककरांचा मानून सर्वांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही बैठक चालली.सिंहस्थ ध्वजारोहण पूर्वतयारीची पुढील बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीस महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर सतिश कुलकर्णी, महंत भक्तिचरणदास, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत रामस्नेहीदास शास्त्री, महंत अनिकेत शास्त्री, रवींद्र पुरी, माधवदास राठी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, निवासी जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील उपस्थित होते.
तसेच भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष राजेश दरगोडे, रामसिंग बावरी, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल, नगरसेविका नीलम पाटील, जुई शिंदे, देवांग जानी, धनंजय पुजारी, प्रतीक शुक्ल, लक्ष्मण सावजी, भानुदास शौचे, वैभव क्षेमकल्याणी, दिगंबर धुमाळ, नंदू मुठे आदी मान्यवर उपस्थित होते.
“सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विचारविनिमयाची बैठक ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची होती. अशा बैठकीत प्रत्येक व्यक्तीचा, विशेषतः महिला अधिकाऱ्यांचा, सन्मान राखणे आवश्यक आहे. पद कोणतेही असो, सार्वजनिक बैठकीत शिष्टाचार आणि मर्यादा पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे अवमानकारक किंवा चुकीच्या वक्तव्याला वेळीच विरोध करून परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे होते. माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नसून, अशा प्रकारच्या अवमानकारक वर्तनाला होता.”
राहुल कुलकर्णी, पंचवटी, मंडल अध्यक्ष,भाजपा




