दिल्ली | वृत्तसंस्था :
भारतीय हॉकीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावत भारताचा झेंडा उंचावला. मोकी, चीन येथे झालेल्या या स्पर्धेत दोन्ही भारतीय संघांनी अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली.
महिला संघाची विजेतेपदाची हॅट्ट्रिक
भारतीय जूनियर महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यात यजमान चीनचा १-० असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा एशिया कपवर नाव कोरले. भारतासाठी सानिका चंद्रकांत माने हिने १७व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. त्यानंतर भारतीय बचावफळीने चीनला एकही गोल करू दिला नाही.
या विजयासह भारताने २०२३ आणि २०२४ नंतर पुन्हा एकदा महिला जूनियर एशिया कपवर कब्जा केला. या कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने आगामी जूनियर विश्वचषकासाठीही पात्रता मिळवली आहे.
पुरुष संघानेही राखला दबदबा
महिलांनंतर भारतीय जूनियर पुरुष हॉकी संघानेही दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मोकी ट्रेनिंग बेस येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर नियंत्रण ठेवले.
या विजयासह भारताने जूनियर पुरुष एशिया कपचे सलग चौथे विजेतेपद मिळवले असून हे भारताचे विक्रमी सहावे विजेतेपद ठरले. पुरुष संघानेही आगामी एफआयएच जूनियर विश्वचषकासाठी पात्रता निश्चित केली आहे.
एकाच दिवशी दोन सुवर्णपदके
महिला आणि पुरुष अशा दोन्ही भारतीय जूनियर संघांनी एकाच दिवशी एशिया कपचे विजेतेपद पटकावणे ही भारतीय हॉकीसाठी मोठी ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. महिला संघाची हॅट्ट्रिक आणि पुरुष संघाचे सलग चौथे विजेतेपद यामुळे भारतीय हॉकीच्या युवा पिढीचे आशियातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.




