नवीन नाशिक | प्रतिनिधी
करोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सुमारे दोन महिन्यांच्या काळात देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशातच वाहतूक शाखा युनिट क्रमांक 3 चे पोलीस नाईक सचिन जाधव यांनी टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना राबवत वाहतूक शाखेच्या परिसरातच बाग फुलवली आहे.
नाशिक शहरात सर्वत्र लॉकडाऊन असताना पोलीस यंत्रणा रस्त्यावर कार्यरत होती. अशातच उन्हाचा पारा देखील वाढू लागला. रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना मदत म्हणून विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वाहतूक शाखेच्या विभाग क्रमांक तीन पाथर्डी फाटा येथे पाण्याच्या बाटल्या दिल्या.
पाणी पिऊन झाल्यानंतर उरलेल्या रिकाम्या बाटल्यांच करायचं काय? असा प्रश्न येथील पोलिस सेवकांत निर्माण झाला, अशातच पोलीस नाईक सचिन जाधव यांच्या मनात टाकाऊ पासून टिकाऊ असे काहीतरी करावे ही संकल्पना आली. त्यात वाहतूक शाखेचा परिसर बागेने घेणे फुलवावा ही संकल्पना पुढे आली.
जाधव यांनी पोलिस शिपाई सोनाली भालेराव यांच्या मदतीने आपले कार्य बजावल्यानंतर उरलेल्या वेळात बाग लावण्याचे ठरविले त्यांना महेंद्र उपासनी यांनी चिनी गुलाबाचे काही रोपं भेट दिले. यासोबतच गोविंद नगर येथील एका नर्सरीचे मालक सागर मोटकरी यांच्यासह उद्योजक किशोर गज्जर, गिरीश आनंद यांनी देखील चिनी गुलाबाचे रोपटे भेट दिली.
त्यांना लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था मनपाचे टँकर चालक शरद बोराडे यांनी केली. जाधव आणि भालेराव यांनी टाकाऊ पाण्याच्या बॉटल्स मध्ये चिनी गुलाबाची रोपे लावून त्यांचे संगोपन सुरू केले. वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या परिसरात सुमारे सव्वाशे गुलाबाचे रोपटे लावले आणि आता त्यात गुलाबाच्या कळ्या फुलायला सुरुवात झाली आहे.
येत्या काही दिवसातच पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी फाटा परिसरात सुंदर अशी बाग फुलल्याचे दिसून येईल असा विश्वास पोलिस सेवकांतुन व्यक्त केला जात आहे. जाधव यांनी राबविलेल्या या संकल्पनेबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी व वपोनी सुभाष पवार यांनी कौतुक केले.