
पेठ | प्रतिनिधी Peth
नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात आज सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. पेठ-दिंडोरी हद्दीलगत एका भरधाव ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील मारुती इको कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, इको कार समोरील दुसऱ्या एका ट्रकच्या खाली अक्षरशः चिरडली गेली. या दुर्दैवी घटनेत इको कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाशिककडून पेठच्या दिशेने मारुती इको कार (क्रमांक जीजे १५ सीआर ५६५९) जात होती. सावळघाटातील तीव्र उतारावर कार असताना, पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकचे (क्रमांक एमएच ०४ जीएफ ८९०१) अचानक ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक थेट समोरील इको कारवर जाऊन धडकला.
घाटात उतार असल्याने या धडकेच्या वेगामुळे इको कार पुढे चाललेल्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रकच्या (क्रमांक एनएल ०१ एसी १९२९) मागील बाजूस अतिशय वेगाने जाऊन धडकली . दोन अवजड ट्रकमध्ये चिरडल्या गेल्याने इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील दोन पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळीच अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. तर दोन प्रवाशांना गंभीर अवस्थेत तातडीने उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४ झाली आहे. १ जणाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. मयत व जखमींची नावे समजून घेण्याचे काम सुरू होते.
घाटात वाहतूक कोंडी; पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच पेठ व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले आणि ते पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या भीषण अपघातामुळे सावळघाटात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला सारून घाटातील वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




