Monday, November 30, 2026
HomeनगरAhilyanagar : बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणार्‍यांवर मकोकांतर्गत कारवाईचे विधेयक

Ahilyanagar : बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणार्‍यांवर मकोकांतर्गत कारवाईचे विधेयक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील घटता मुलींचा जन्मदर रोखण्यासाठी आता शासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणार्‍यांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी केली जाणार असून, अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी असणार्‍यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक आणले जाणार आहे. यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, अहिल्यानगर शहरातील पाच रक्तपेढ्यांमध्ये तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आली आहे. या रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, चौकशीत दोष सिद्ध झाल्यास परवाने निलंबित करण्याचा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला. आरोग्य संवाद यात्रेअंतर्गत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रविवारी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर नगरला लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आरोग्य सेवेतील समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी आमदार काशीनाथ दाते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे उपस्थित होते. रक्तदान हा सेवाभावाचा विषय असताना काही ठिकाणी त्याचे व्यावसायिकीकरण होत असल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. अहिल्यानगरमधील पाच रक्तपेढ्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध न करून देणे, प्लाझ्माची वाढीव दराने विक्री करणे आणि दैनंदिन रक्तसंकलनाची आकडेवारी जाहीर न करणे, अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी नोटिसा बजावून चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जनआरोग्य योजनेत पैसे उकळल्यास रुग्णालयांवर कारवाई
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारता येत नाही. तरीही काही रुग्णालयांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांची प्रमाणपत्रे तपासणार
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, सरपंच आणि नागरिकांकडून आरोग्य सुविधांबाबत अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविणे, रिक्त पदे भरणे, इमारतींची बांधकामे व दुरुस्ती तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांचा त्यात समावेश आहे. या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची अधिकारी टीम सोमवारपासून कामाला लागणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी डॉक्टरांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनएचएमच्या 15 हजार कर्मचार्‍यांना कायम सेवेची पत्रे
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे 15 हजार कर्मचार्‍यांना सोमवारपासून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील पत्रे देण्यास सुरुवात होणार आहे. आरोग्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. एड्स नियंत्रण विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवरही दोन दिवसांपूर्वी बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

Crime Diary : गुन्हेगारी टोळ्यांची मस्ती जिरविण्यासाठी पोलिसांचा धडाका

0
अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला आहे. मकोका, एमपीडीए आणि हद्दपारी अशा कठोर...