Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमंदिरातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज लंपास

मंदिरातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज लंपास

घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद; भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

- Advertisement -

उमराणे | वार्ताहर Umrane

हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील देवळा फाट्यालगत असलेल्या सौंदाणे येथील पुरातन रामदेवजी बाबा मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडत सोन्या-चांदीचे दागिने व हजारो रूपयांची रोकड असा सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाली असून दोन चोरटे तब्बल तासभर मंदिरात चोरीसाठी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले असल्याने या दोघा चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी प्रारंभ केला आहे.

या घटनेचे समजलेले वृत्त असे की, रामदेवजी बाबा मंदिरात काल रात्री पुजारी व मंदिराचे सचिव शरद कुमावत हे नेहमीप्रमाणे पुजाविधी आटोपल्यानंतर झोपले होते. नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता पुजेसाठी गेलेल्या पुजारी राधेशाम महाराज यांना मंदिराच्या मागील गेटचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी शरद पेंटर यांना जागे करत देवस्थानच्या विश्वस्तांना माहिती दिली. सदर माहिती मिळताच देवस्थानचे अध्यक्ष निलेश कर्नावट, मनोज पवार, दादासाहेब पवार, यशवंत कुमावत यांनी मंदिरात धाव घेत घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यास चोरीची माहिती दिली.

मंदिरात चोरीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सावंतजी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी जड असल्याने ती उचलता येत नसल्याने चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून पेटीत असलेले दागिने, सुमारे साडेपाच किलो चांदीचे छोटे-मोठे मुकुट, कडे, घोडे, रत्नांचा हार आणि जवळपास ४० ते ५० हजाराची रोकड असा सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल दोघा चोरट्यांनी काढून घेत पलायन केले. चोरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून, चोरटे सुमारे तासभर मंदिरात चोरी करत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.

मंदिरातील या चोरीची गंभीर दखल घेत पोलिसांनी पंचनामा करीत तातडीने चोरट्यांच्या शोधार्थ ठसेतज्ञांना व श्वान पथकास पाचारण केले. श्वान पथकाने मंदिरापासून वनराईतून महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला. महामार्गावरून चोरटे वाहनातून पसार झाले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दोघे चोरटे स्पष्टपणे दिसून येत असल्याने पोलिसांनी या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.

ग्रामस्थांची गर्दी
रामदेवजीबाबा देवस्थानात चोरी झाल्याचे वृत्त पसरताच उमराणे, सौंदाणेसह पंचक्रोशीतील भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती. सौंदाणे सरपंच चेतन पवार, देवस्थानचे ट्रस्टी दिलीप बाफना, विनोद पाटणी, सुभाष बाफना, राज छाजेड, उत्तम टाक, नथा देवरे, घनश्याम कर्णावट, पापा टाक, निलेश टाक, संदीप पवार, अनिल पवार आदींनी या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून, पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : कागदावरील स्मार्ट सादरीकरण अन् रस्त्यावर २५ फुट खड्डा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी आता अवघे दोन महिने उरलेले असताना कुंभमेळा आयुक्तांनी, काळजी नको, सगळं काही ठीक होईल,...