गडचिरोली | वृत्तसंस्था Gadchiroli
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांना आरोग्यसेवा थेट त्यांच्या गावात उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. खनिज बाधित क्षेत्रातील नागरिकांना उपचारासाठी करावा लागणारा लांबचा प्रवास, वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून ४ कोटी ९९ लाख रुपयांचा ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (फिरते रुग्णालय) प्रकल्प राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि मुलचेरा या आदिवासीबहुल तालुक्यांतील अनेक गावात दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि विशेषतः पावसाळ्यात दळणवळणाच्या अडचणींमुळे नागरिकांना वेळेवर आरोग्य विषयक उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानअंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत आवश्यक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज फिरते रुग्णालय निश्चित वेळापत्रकानुसार दुर्गम गावांमध्ये पोहोचणार आहे. नागरिकांची आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि औषधवाटप या सेवा गावपातळीवर उपलब्ध होणार आहेत. माता व बाल आरोग्य, हिवताप, क्षयरोग आणि कुपोषण यांसारख्या आरोग्य समस्यांचे लवकर निदान करून वेळेवर उपचार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी नजीकच्या आरोग्य संस्थेत पाठविण्यात येणार आहे.
रुग्णवाहिका सेवेमुळे आरोग्य यंत्रणेला बळकटी
फिरत्या रुग्णालयासोबतच दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन्ही आरोग्यसेवांसाठी एकूण ६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे खनिज बाधित क्षेत्रातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून खनिज बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्यात येत आहे. ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’मुळे दुर्गमतेमुळे आरोग्यसेवेपासून दूर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या गावातच प्राथमिक उपचार व तपासणीच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान, गडचिरोली यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आरोग्य सेवा आपल्या दारी – एआय आधारित फिरते रोगनिदान केंद्र’ (हॉस्पिटल ऑन व्हील्स) उपक्रमाचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या फिरत्या रोगनिदान केंद्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून हा उपक्रम खनिज बाधित क्षेत्रातील एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि मुलचेरा या दुर्गम तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून दुर्गम गावांतील नागरिकांना त्यांच्या दारीच वैद्यकीय तपासणी, प्राथमिक उपचार, औषधवाटप आणि आवश्यक आरोग्य चाचण्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच माता व बाल आरोग्य, हिवताप, क्षयरोग आणि कुपोषण यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे दुर्गम व संपर्कहीन गावांतील नागरिकांना आरोग्य सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत.
यावेळी केंद्रीय मंत्री जुएल ओराम, मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. मिलिंद नरोटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @jualoram @drashokuike_mla @Narhari_Zirwal @MilindNarote
#Maharashtra #DevendraFadnavis #JanjatiyaGauravDiwas #DiscoverGadchiroli— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2026




