.
येवला | प्रतिनिधी Yeola
शहरातील कासार गल्ली परिसरात बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी २३ तोळे सोन्याचे दागिने, चार लाख रुपयांची रोकड, नवीन अॅक्टिव्हा दुचाकी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरून नेण्यात आला. भरवस्तीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सेवानिवृत्त मंडळ अधिकारी पुष्कराज केवारे हे शुक्रवारी कुटुंबासह पुणे व त्यानंतर जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचे कडीकोंडे तोडून आत प्रवेश केला. कपाटे व घरातील साहित्य अस्ताव्यस्त करत चोरट्यांनी सोन्याचे हार, नेकलेस, टॉप्स, बांगड्या, अंगठ्या असा सुमारे २३ तोळे सोन्याचा ऐवज आणि चार लाखांची रोकड लंपास केली. तसेच ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा व डीव्हीआरही चोरून नेला.
शनिवारी सकाळी घरकाम करणाऱ्या महिलेने दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. सायंकाळी केवारे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
याप्रकरणी पुष्कराज केवारे यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, बाहेरगावी जाताना घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि शेजारी तसेच पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी केले आहे.




