नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
येऊ घातलेल्या सिंहस्थ मेळ्याच्या निमित्ताने काय बघायला मिळेल याचा काही नेमच राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वीच सिंहस्थ कामात आमच्या वाट्याचे काय, असा सवाल विचारणार्या काही नगरसेवक व झेरॉस नगरसेवकांना पोलिसांनी प्रतिसाद दिल्याची बातमी शिळीही होत नाही तोच त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी पैसे घेतल्याच्या आऱोपावरून विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला अटक झाली. नाशिकमधील सिंहस्थाशी संबंधित बातमीतील नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे तर त्र्यंबक दर्शन प्रकरणातील विश्वस्त हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आहेत.
पैसे कमावण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी पक्षोपपक्षांचे काही बंधन नसते, हे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाशिक व त्र्यंबकेश्वर अशा दोन्ही ठिकाणी सिंहस्थ मेळा भरतो. साहजिकच, दोन्ही ठिकाणी सध्या युद्धपातळीवर विकासकामे सुरू आहेत. त्र्यंबकेश्वरला तर बारमाही गर्दी असते. एका अंदाजानुसार दररोज साधारण पन्नास हजारांहून अधिक भाविक येत असावेत. श्रावणात हीच गर्दी कितीही पट वाढलेली असते. किमान सहा ते सात तास दर्शनासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा मधला काही मार्ग मिळाला तर तो भाविकांनाही हवा असतो. असा मार्ग काढून देण्याची एक ‘राजमान्य’ सेवा तेथे काही लोक उपलब्ध करून देत असतात.
यामध्ये विश्वस्त असतात, पुजारी असतात, संस्थेचे शिपाई, पालिकेचे कर्मचारी एवढेच नव्हे तर गेलाबाजार सुरक्षिततेसाठी असलेले पोलीसही असू शकतात. ही फार मोठी साखळी आहे. अनेकदा आवाज उठविला गेला; पण तेथील पैशाचा खणखणाटच एवढा मोठा आहे की, असा विरोधी सूर दबून जातो. परवाच्या घटनेत कडलग याचा नातेवाईक दर्शनासाठी पैशाचा व्यवहार करताना पकडला गेला. त्याच्यासह काही लोकांना धरल्यानंतर त्यातून या ‘पुरुषोत्तमाची लाईन’ पुढे आली. पुरुषोत्तम कडलग हे संस्थानचे विश्वस्त तर आहेतच शिवाय गावात इस्टेट एजंटचेही काम करतात. युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर नुकतीच त्यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी बढती झाली होती.
त्र्यंबकचे प्रतिष्ठित घराणे म्हणून कडलग परिवाराला ओळखले जाते. मात्र, अलीकडे विश्वस्तांच्या निवडीत झालेल्या असंख्य भानगडींची गावभर चर्चा झाली तेव्हा कडलगांवरही ही शंकेची सुई फिरली. अर्थात, असे आक्षेप सगळ्यांबाबतच आहेत. शरद पवार यांनी वारकरी समाजातील घुसखोरीविषयी मध्यंतरी केलेल्या वक्तव्याचा भाजपचे धार्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी प्रतिवाद केला होता. त्याला उत्तर देताना कडलग यांनी भोसलेंचा बराच उद्धार केला. त्याचा या अटकेशी काही संबंध आहे का, अशीही आता चर्चा आहे. कदाचित तसे असेलही; पण काही आठवड्यांपूर्वी मंदिरात एका प्रवाशाला सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीचे पुढे काय झाले, कोणावर त्याचा ठपका आला याची कोणतीच माहिती बाहेर आलेली नाही.
हे प्रकरणही दडपून टाकले, असा लोकांचा समज आहे. कडलग यांचा चुलत भाऊ अमोल हा अजित पवार गटाचा नगरसेवक आहे. भाजपची तेथील सत्ता जाण्यामध्ये कडलगांची शिंदेसेनेला झालेली मदत हादेखील एक फॅटर या प्रकरणात चर्चिला जातोय. या प्रकरणातील अशा राजकीय अंतरंगांची आवरणं पुढे येत असली व त्यात भविष्यात काही सत्यता दिसली तरीदेखील वर्तमानात कडलगच्या माणसांनी दर्शनासाठी पैसे घेतल्याचे सत्य तर नाकारता येत नाही. पोलीस त्यांच्या पद्धतीने चौकशी करून यातील सत्य शोधतीलही कदाचित.
पण यानिमित्ताने तेथील दर्शन घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्याची हिंमत प्रशासन दाखविणार का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. ‘हमाम में सब नंगे’ असे खरे तर तेथील वास्तव आहे. साध्या पालिकेच्या निवडणुकीतही कोट्यवधी रुपये खर्च करू शकणारी मंडळी या नगरात पायलीला पन्नास असतील. जमिनीचे व्यवहार करणे, त्यासाठी गुन्हेगारी व्यवसायातील लोकांची मदत घेणे, अशा बाह्य शक्तींच्या हातातच वेगवेगळ्या कामांचे ठेके देणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. ते कोणाच्या आशीर्वादाने हे सर्वश्रुत आहेच. त्र्यंबकेश्वरनगरी पौराणिक महत्त्व असलेली आहे. हिंदू धर्मातील एक पवित्र तीर्थस्थळ आहे. या ठिकाणच्या विविध व्यवस्था पाहणार्यांकडूनच जर बेकायदा उद्योग केले जाणार असतील तर त्या धार्मिक पावित्र्याला बट्टा लागतोय, असे कधी या मंडळींच्या मनातही येत नसेल का? नाशिकमध्येही अशाच काही शक्ती कार्यरत आहेत.
या सर्वांचा उद्देश केवळ पैसे कमावणे एवढाच असेल तर मग धर्माचा आधार तरी कशाला हवा, सरळ धंदाच सुरू करायचा! विश्वस्त होण्यासाठी जर कोट्यवधी, लाखोंची बोली लागणार असेल आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणार असेल तर नैतिकता शिल्लक कुठे राहिली? हल्ली नाशिकच्या महापौर प्रत्येक ठिकाणी नाशिकमधील काही विद्यमान नकारात्मक गोष्टींचा उल्लेख करून सिंहस्थ पर्वणीपूर्वीच या विषवल्ली एकदाच्या निघून जात आहेत, असे बोलतात. त्यांच्या दृष्टीने ते खरेही असू शकेल; पण अशा गोष्टींमुळे नाशिकनगरी बदनामीच्या दलदलीत दिवसेंदिवस अधिकाधिक फसत चालली आहे, हे सत्य तर उरतेच. आता ही साफसफाईची जबाबदारी कोणी घेणार आहे का?




