Tuesday, November 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्याच्या महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना

राज्याच्या महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना

समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

सन २०३० पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या राज्य सरकारने कर आणि बिगरकर महसुलात वाढ करण्यासाठी ‘महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समिती’ गठीत केली आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या समितीत पाच तज्ज्ञांचा समावेश आहे. राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागाचे सह आयुक्त एस. षण्मुगराजन हे या समितीचे निमंत्रक आहेत. समितीला कालबद्ध शिफारशींसह अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. वित्त विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

जवळपास साडेनऊ लाख कोटीचे कर्ज डोक्यावर असलेल्या राज्य सरकारने ‘विकसित महाराष्ट्र @ २०४७’ हे संकल्पचित्र स्वीकराले आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ विकास, जलसुरक्षा, नागरी व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण यासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गुंतवणूक आवश्यक आहे. सध्या राज्य सरकारला मिळणाऱ्या एकूण एकूण महसुली उत्पन्नापैकी कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन आणि सरकारी कल्याणकारी योजना आणि घेतल्या कर्जावरील व्याज फेडीवर मोठा खर्च होतो.

या पार्श्वभूमीवर करसंकलनात सुधारणा करून करगळती रोखणे, करांचे दर, शुल्क आणि सवलतींचे तर्कसुसंगतीकरण करणे, सार्वजनिक मालमत्ता आणि उपक्रमांमधून मिळणारा परतावा वाढवणे. महसुलाचे नवे आणि अद्याप पुरेसे वापरात न आलेले स्रोत शोधणे, सार्वजनिक खर्चाची कार्यक्षमता वाढवून राज्याच्या स्वतःच्या कर आणि करेतर महसुलात शाश्वत वाढ करण्यासाठी तसेच राज्याची वित्तीय स्थिती सुदृढ करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.

माहिती मागविण्याचा अधिकार
राज्यातील कोणताही विभाग, सार्वजनिक उपक्रम, मंडळ, प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महसूल संकलन करणारी यंत्रणा यांच्याकडून कोणतेही अभिलेख, विवरणपत्रे, विदा अथवा अहवाल मागविण्याचा आणि अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून माहिती सादर करण्यास सांगण्याचा अधिकार समितीला देण्यात आला आहे. तसेच जीएसटी, व्हॅट, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, मोटार वाहन कर, ऊर्जा आणि वीज शुल्क, खनिजे, बिगरकर महसूल, सार्वजनिक उपक्रमांचे लाभांश, खर्चाची कार्यक्षमता आणि वित्तीय अहवालांचे सादरीकरण अशा विविध विषयांसाठी उपसमित्या किंवा कार्यगट स्थापन करण्याची मुभाही समितीला देण्यात आली आहे.

समितीची रचना
डॉ. केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्य म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठचे प्राध्यापक कार्तिक मुरलीधरन, राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, रिझर्व्ह बँकेचे माजी उपगव्हर्नर टी. रबी शंकर, द इंडियन इकॉनॉमेट्रिक सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. आशिमा गोयल आणि वित्त विभागाचे सचिव यांचा समावेश आहे. अध्यक्षांना राज्य सरकारच्या संमतीने समितीवर आणखी दोन सदस्य सहनियुक्त करण्याची मुभा देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...