अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मेंबरसोबत राहतो म्हणत माजी नगरसेवक सचिन जाधव याच्यासह चौघांनी एका हॉटेल व्यावसायिकाला अडवून मारहाण केली. चॉपरसारखे धारदार शस्त्र काढून हल्ला केला. त्यात व्यावसायिक दिनेश दत्तात्रय खरपुडे (वय 33, रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा) जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून रविवारी (22 नोव्हेंबर) सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक जाधव याच्यासह सचिन राऊत ऊर्फ नफर्या, नितीन सुरसे व बंटी ऊर्फ स्वप्निल बेंद्रे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मच्छी मार्केटजवळ घडली. खरपुडे हे 19 नोव्हेंबर रोजी रात्री अरणगाव येथून जेवण करून कोठला स्टँडजवळील वंजार गल्लीकडे जात होते. मच्छी मार्केटजवळ सचिन जाधव व त्याचे साथीदार उभे होते. यावेळी सचिन जाधव याने खरपुडे यांना अडवून मेंबरसोबत राहतो, म्हणून शिवीगाळ केली.
खरपुडे यांनी शिव्या का देतो, अशी विचारणा केली असता जाधव याने त्यांना मारहाण केली. यानंतर जाधव याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून चॉपरसारखे धारदार शस्त्र काढून खरपुडे यांच्यावर हल्ला केला. इतर संशयितांनीही मारहाण केली. ‘याला संपवून टाका, मी पाहतो काय होते ते, तुम्ही घाबरू नका,’ असे म्हणत जाधव याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे खरपुडे यांनी जबाबात म्हटले आहे.




