श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur
लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर गेल्या 12 ते 15 वर्षांपासून बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी आणि तिचा बेकायदेशीर गर्भपात करून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह राहुरी येथील दोन डॉक्टरांना आरोपी करण्यात आले आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रावसाहेब सदाराम खेवरे (रा. राहुरी, ता. राहुरी) आणि त्याचे साथीदार डॉ. संजय दादा म्हसे व डॉ. अनंत शेकुकर (दोघे रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीनुसार रावसाहेब खेवरे याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्या मित्राच्या मदतीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. आरोपीने श्रीरामपूर शहरातील संजयनगर पाण्याच्या टाकीजवळ (वॉर्ड क्र. 01, श्रीरामपूर) येथील घरी येऊन तिला आपल्यासोबत नेले.
गेल्या 12 ते 15 वर्षांपासून तिला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. या अत्याचारातून पिडीत महिला सात ते आठवेळा गर्भवती राहिली. मात्र, प्रत्येकवेळी राहुरी येथील डॉ. संजय म्हसे आणि डॉ. अनंत शेकुकर यांच्या मदतीने तिचा गर्भपात घडवून आणला. वारंवार केलेल्या गर्भपातामुळे पिडीतेच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गंभीर प्रकारानंतर पिडीतेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे करीत आहेत.




