अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या ऊसाला मनाप्रमाणे दर जाहीर न केल्यास 28 तारखेला शेतकरी संघटनांच्यावतीने जिल्ह्यात रेलरोकोसह रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला. नगरमध्ये शेतकरी उस दर आंदोलनात राजू शेट्टी बोलत होते.
नगर जिल्ह्यातील ऊस दरासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक घेण्याच्या निर्णयाबाबत अधिक माहिती देतांना शेट्टी यांनी नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी खा. नीलेश लंके यांनी देखील जोरदार टीका केली. मी शेतकर्यांचा मुलगा असून शेतकर्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांच्या ऊसाला 26 तारखेच्या बैठकीत निर्णय न झाल्या, योग्य दर जाहीर न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनीदिला. यावेळी राजू शेट्टी नगरच्या आंदोलनाला सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत कमी गर्दी असली तरी या जिल्ह्यात बर्याच वर्षानंतर शेतकरी ऊस दरावर आंदोलन करण्यासाठी घरातून बाहेर पडले हे महत्वाचे आहे. शेतकरी आपल्या कष्टाने ऊस पिकवत असून त्याच्या घामाचे दाम त्याला मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान, उसदरप्रश्नी काही निर्णय झाला तरी यापुढे शेतकर्यांनी त्यांच्या ऊसाचे खासगी वजन काट्यावर वजन करून गाळपासाठी पाठवावे, जेणे करून उसाच्या वजनातील कारखान्यांची काटामारी थांबेल, असे शेट्टी म्हणाले.
ऊसापेक्षा केसाची शेती किफायतशीर
सध्या केसाला 5 हजार रुपये प्रति किलो दर मिळत आहे; म्हणजेच तो दर प्रतिटन 50 लाख रुपये होतो. त्या तुलनेत शेतकरी आपल्या ऊसाला केवळ 4 हजार रुपये प्रतिटन दर मागत आहेत. मात्र, तोही मिळत नसेल तर ऊसापेक्षा केसाची शेतीच अधिक किफायतशीर ठरेल, असा मार्मिक टोला शेट्टी यांनी लगावला. तसेच शेतकरी सध्या केवळ साखरेच्या दरावर आधारित योग्य मोबदला मागत असून बगॅस, इथेनॉल आणि इतर उपउत्पादनांतून मिळणारे उत्पन्न वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी अहिल्यानगरचे दर पाहून कोल्हापुरातील शेतकर्यांना दर मिळत होते; आता उलटी परिस्थिती निर्माण होऊन कोल्हापूरप्रमाणे अहिल्यानगरला दर मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
साखर उतारा आणि काळा पैसा
अहिल्यानगर जिल्ह्यात दहा-बारा वर्षांपूर्वीचा साखर उतारा आणि सध्याचा साखर उतारा यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या जिल्ह्यात साखर उतार्यात फेरफार करून चोरी केली जात आहे. यंदा जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांचा साखर उतारा 11.18 टक्के असतानाही त्या प्रमाणात शेतकर्यांना दर दिले जात नाहीत. या साखर उतारा चोरीतून काळा पैसा निर्माण केला जात असून त्याचा वापर आपल्याविरोधात निवडणुका लढवण्यासाठी केला जातो, असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला.
शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आज सकाळी 10 नंतर नव्याने ऊसतोड आणि वाहतूक करू नये, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. या आदेशाची कारखान्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच 26 तारखेच्या बैठकीपर्यंत ऊसतोड व वाहतूक बंद ठेवावी; अन्यथा वाहतूक सुरू राहिल्यास आणि त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करत शेट्टी यांनी पोलिस प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आवाहन केले.
मागील वर्षीच्या 40 टक्के साखरेचा हिशोब द्या
यंदाच्या साखर उतार्यानुसार दर जाहीर करण्याबरोबरच जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामातील शिल्लक 40 टक्के साखरेचा हिशोब आधी द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. अनेक कारखान्यांनी साखर प्रति क्विंटल 5 हजार रुपयांहून अधिक दराने विकली आहे; त्यामुळे त्यांनी ऊसाला काय दर दिला हे जाहीर करावे, असे ते म्हणाले.
परताव्याच्या ठेवी परत करा
या वेळी आमदार काशीनाथ लंघे म्हणाले की, साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या परताव्याच्या ठेवीपोटी शेकडो कोटी रुपये कपात केले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे ही रक्कम तातडीने शेतकर्यांना परत करावी. तर आमदार अमोल खताळ यांनी सहकारात आघाडीवर असलेल्या कारखान्यांनी दर जाहीर करताना मनमानी करणे योग्य नसून संगमनेर साखर कारखान्याने 4 हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी केली. या प्रसंगी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचीही भाषणे झाली.
आजपासून दोन दिवस ऊस तोड बंद
26 तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्याची साखर कारखान्यांच्या चेअरमन यांना सक्ती
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या ऊसाला कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या धर्तीवर चार हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल मिळावी, साखरेचे भाव 5 हजार 300 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्यास त्यानूसार गाळप पूर्ण झाल्यावर शेतकर्यांचा हिशोब होवून त्यांना फरकाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटनाच्यावतीने सोमवार (दि. 23) रोजी मोर्चा काढून शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांच्यावतीने दखल घेण्यात आली असून शेतकर्यांच्या ऊस दरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 26 तारखेला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या बैठकीला कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या चेअरमन यांना सक्तीने हजर राहण्याचे आदेश काढले आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांचे चेअरमन यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी, व्यवस्थापकीय संचालक यांना उपस्थित ठेवून नयेत, असे आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच आज सकाळी दहा वाजपर्यंत जिल्हाभर तोडलेल्या ऊसाचे गाळप पूर्ण करून त्यानंतर कारखान्यांनी 26 तारखेला होणार्या बैठकीपर्यंत नव्याने ऊसाची तोडणी करून नयेत, शेतकरी संघटनांच्या मागणीनूसार ऊस तोडणी स्थगित ठेवण्यात यावी, अशी सुचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी काढल्या आहेत.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात झालेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते आणि प्रादेशिक सहसंचालक साखर गणेश पुरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्याकडील आदेशाचे पत्र आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी यांना दिल्यानंतर शेतकरी संघटनाचे धरणे आंदोलन स्थगित केले. यावेळी आंदोलनाला खा. नीलेश लंके, माजी मंत्री महादेव जानकर, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, शेतकरी संघटनेचे नेते रावसाहेब लवांडे, रविंद्र मोरे, अभिजत पोटे, अंकुश काळे, मच्छिंद्र आर्ले, प्रकाश देठे, अनिल इंगळे, सुनील इंगळे, जितेंद्र भासेले, सोलापूरहून बालवडकर तात्या यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कलम 163 नुसार उपस्थिती बंधनकारक
या बैठकीसंदर्भात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 नुसार आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी आपल्या पत्रात नमूद आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांच्या चेअरमननी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. या बैठकीत ऊसदराच्या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकार्यांसोबत शिष्टमंडळाची चर्चा
आंदोलन सुरू असतांना खा. लंके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांची भेट घेत शेतकरी संघटनेसह शेतकर्यांच्या ऊसदरप्रश्नी विविध मागण्या केल्या. यावेळी शेट्टी हे आंदोलनस्थळी होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांपैकी मोजक्या नेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चेसाठी पाठवले.




