नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
नाशिक शहर काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीवरून सध्या राजकीय वर्तुळात बरीच उलटसुलट चर्चा होत असली तरी त्यात यांना एवढे कार्यकर्ते मिळाले तरी कुठून या शंकायुक्त प्रतिक्रियेचा भाग मोठा आहे. हा पक्ष किमान नाशिकमध्ये तरी अस्तित्वात राहील का, असा प्रश्न मध्यंतरी पडला होता. कारण पक्षात अध्यक्ष व्हायला कोणी तयार नाही, नव्याने यायला कोणी तयार नाही, कार्यालयाची घरपट्टी थकल्यावरून थेट जप्तीपर्यंत नोटिसा येणे अशा भीषण अवस्थेत पक्ष येऊन पोहोचला होता. पक्षाला लागलेली गळती थांबायला तयार नव्हती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहू खैरे, हेमलता पाटील, राहुल दिवे, समीर कांबळे आदी वर्षानुवर्षे काँग्रेसबरोबर पिढीजात राहिलेले पक्ष सोडून जात होते.
आज भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता असली तरी अगदी निवडणुकीपूर्वी वा त्याआधी काही वर्षे काँग्रेसमधून इतर पक्षात जाण्याची लाट आली होती. अगदी शिवसेनेतही जाणे अनेकांनी तेव्हा पसंत केले होते. राजकीय भवितव्याची स्थिरता ही तेव्हा अनेकांना महत्त्वाची वाटली असेलही. पक्ष अगदीच कृश झालेला असतानाही या ओसाड गावच्या पाटीलकीसाठी इनमीन तिघांमध्ये म्हणजेच उरल्यासुरल्यांमध्ये पदांसाठी जी काही लठ्ठालठ्ठी चाललेली असायची की त्यालाच कंटाळून अनेकांनी तेव्हा पक्षाचा त्याग केलेला असू शकतो.
गुरुमितसिंग बग्गा व हेमलता पाटील ही त्याची काही जितीजागती उदाहरणे सांगता येतील. त्यामुळेच काँग्रेसविषयी कोणालाही काही भरवसा वाटत नव्हता. अशा या प्रतिकूल परिस्थितीत बबलू खैरे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि काही दिवसांतच सृजन संघटन या उपक्रमासाठी नाशिकची निवड होऊन राहुल गांधी येऊन गेले. हा एक योगायोग असला तरी त्यानंतर पक्षात काही लक्षणीय बदल दिसू लागले. अर्थात, जंतरमंतरवरील जेन झीच्या आंदोलनानंतर देशभरच काँग्रेसला व विशेषत: राहुल गांधी यांना व्यापक स्वीकारार्हता मिळायला लागल्याचाही हा परिपाक असावा.
असो, अशा या स्थित्यंतराच्या कालखंडात पक्षाने शहरासाठी ५१ जणांच्या कार्यकारिणीची गरज असताना चक्क ७२ जणांची नियुक्ती करून सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचे कारण ती सर्वसमावेशक व्हावी, मुस्लीम, ख्रिश्चन, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, बहुजन समाज अशा सर्वच समाजघटकांना स्थान देण्याचा त्यात जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला दिसतो. गंमत म्हणजे, आणखी पाच-दहा जण वेटिंगवर असल्याचेही सांगितले जाते. त्यांना नंतर सामावून घेतले जाणार आहे. सातपूर, जुने नाशिक, पंचवटी, सिडको अशा भागांना प्रतिनिधित्व दिले गेले आहे.
नाशिकरोड भागाचे प्रतिनिधित्व असले तरी ते तुलनेने कमी असल्याचे दिसते. नाशिकचे प्रथम महापौर शांतारामबापू वावरे, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, विजय राऊत आदी जुन्या जाणत्यांच्या पुढच्या पिढीला स्थान देताना घराणेशाहीचा आरोप सहन करण्याची तयारी ठेवलेली दिसते. सुफी जीन यासारख्या सधन कोकणी परिवारातील युवकास प्रथमच संधी देऊन लंगडी बाजूही भक्कम केलेली दिसते. उल्हास सातभाई या अत्यंत जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यावर समन्वयकाची जबाबदारी देताना त्यांच्या निष्ठेची कदर केलेली दिसते. रमेश जाधव, उद्धव पवार, सुनील महंकाळे, संदीप शर्मा, गणेश भोरे, कुसुमताई चव्हाण, लक्ष्मण धोत्रे, डॉ. सुचेता बच्छाव, डॉ. सुभाष देवरे, केशवअण्णा पाटील कोठावळे, बाळासाहेब गामणे, मंगेश लहामगे, राजेंद्र बागुल आदी भाजपच्या वावटळीतही वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्यांवरही विश्वास टाकण्यात आला आहे.
नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर चार हात दूर राहणे पसंत करणारे माजी अध्यक्ष आकाश छाजेड यांनाही विशेष निमंत्रितांमध्ये स्थान देऊन गटबाजीची कीड कायमस्वरुपी नष्ट करण्याचाही विचार दिसतो. याव्यतिरिक्त आणखीही काही जुनी नावे जरूर आहेत; पण नव्या कार्यकर्त्यांना मिळालेली संधी ही अधिक महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे नेत्यांनी सांगितले आणि नियुक्त्या झाल्या असे यात घडलेले नाही, असे सांगितले जाते. ते जर खरे असेल तर मग काँग्रेस खरोखरच कात टाकत आहे, असे म्हणता येऊ शकते. अर्थात, तरीही काही नावे ही त्याच त्या राजकीय घराण्यातील जरूर आहेत. पण ती पक्षात टिकून असल्याने कदाचित हा त्यांच्या निष्ठेचा भाग म्हणून समजला गेलेला असू शकतो. पक्षाकडे निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध नव्हते, याची जाण आल्याने जे निष्ठावान आहेत, त्यांनाच सोबत घेण्याचा राजकीय शहाणपणा यातून डोकावतो.
राज्यभरातील असे सगळेच जिल्हा, शहर पदाधिकारी निवडताना विविध बैठका, सामान्यांशी चर्चा केली गेल्याचे कळते. केंद्रीय स्तरावरील नेत्यांनीही स्थानिक पातळीवर येऊन या निवडीत लक्ष घातले. शेवटच्या स्तरापर्यंत विश्वास वाटावा अशी पद्धत यावेळी वापरली गेल्याचे सांगितले जाते. अध्यक्ष बहुसंख्याकांचा प्रतिनिधी असल्याने इतर समाजघटकांना योग्य ती संधी मिळेल याकडे काटेकोरपणे पाहिले गेलेले दिसते. विशेष निमंत्रितांमध्ये ज्येष्ठांना स्थान दिले गेले असले तरी गं. पा. मानेंसारख्या नव्वदीला टेकलेल्या ज्येष्ठालाही सोबत घेणे ही अपरिहार्यता की गरज हे कळले नाही. अध्यक्ष बबलू खैरे हेदेखील घराणेशाहीचेच प्रतिनिधी आहेत; पण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचे अध्यक्षपद सांभाळण्याची तयारी व हिंमत दाखविली हे महत्त्वाचे.




