Tuesday, February 3, 2026
Homeनगरगोदावरीच्या पावनभूमीत 178 व्या सप्ताहाच्या महाकुंभाचा योग जुळून आला - रामगिरी महाराज

गोदावरीच्या पावनभूमीत 178 व्या सप्ताहाच्या महाकुंभाचा योग जुळून आला – रामगिरी महाराज

माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav

गौतम ऋषींनी आणलेल्या गोदावरी या दक्षिण गंगेचा उगम ब्रह्मगिरी मधून होतो. पवित्र आणि ज्ञानदान करणार्‍या या गोदावरीच्या कुशीत प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेले आहे. अशा या पावन झालेल्या परिसरात अनेक ठिकाणी देव देवतांचे अस्तित्व आहे. इथ आल्यावर महाकुंभाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही, अशा या शनिदेवगाव सप्तक्रोशीच्या पावनभूमीत पवित्र गोदातीरी योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने 178 व्या सप्ताहाच्या महाकुंभाचा योग जुळुून आला, असल्याचा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी शनिदेवगाव येथील 178 व्या सप्ताहात दुसरे पुष्प गुंफताना प्रवचनातून केला.

- Advertisement -

श्रीरामपूर-वैजापूर तालुका हद्दीवर गोदातीरावर शनिदेवगाव सप्तक्रोशी येथील योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा काल गुरूवारी दुसरा दिवस संपन्न झाला. आमटी भाकरी महाप्रसादाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेवून, प्रवचन श्रवण केले. महंत रामगिरी महाराज यांनी भगवद् गीतेच्या 11 व्या अध्यायातील 54 व्या श्लोकावर अनन्य व निष्काम भावनेने केलेल्या भक्तीसह, पवित्र ज्ञानदान देणार्‍या गोदावरीचे महत्व भाविकांसमोर प्रवचनातून मांडले.

YouTube video player

शनिदेवगाव सप्तक्रोशीत गोदातीरावरील विविध देवदेवतांच्या स्थानांचे महत्व सांगताना महाराज पुढे म्हणाले, या पवित्र गोदातीरावरील 178 व्या सप्ताह भूमी दंडकारण्य प्रभु रामचंद्रांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली आहे. गावात हेमांडपंथी शिवालय, पुरातन शनैश्वर देवस्थान, जिथ जाव तिथ देवदेवतांचे स्थाने आहेत. पलिकडच्या तिरावर डोमेग्राम येथील श्रीचक्रधर स्वामींचे वास्तव्य असलेले श्रीकृष्ण मंदिर, शीख बांधवांचे गुरूद्वारा देवस्थान, या भूमीत स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी वास्तव्य केलेले आहे. गोदावरी पात्रात पूर्वी जलाशय साठ्याच्या खोल रांजण खळगेच्या पाऊल खुणांचा इतिहास सद्गुरु नारायणगिरी महाराज यांनी सांगितला असल्याची आठवण यावेळी प्रवचनातून महाराजांनी करून दिली.

‘गो म्हणजे ज्ञान, दा म्हणजे दान’ अशा ज्ञानदान देणार्‍या गोदावरीचे वर्णन करताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञान गोदावरीचे तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवांचे अंतरीं भगवान दत्तात्रये योगी, सर्व ज्ञानात अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे, अस मानल जात, आणि अन्नदानात तृप्ती आहे. अन्नदान करताना पुरे पुरे म्हणतो, दुपारनंतर पुन्हा भूक लागते. म्हणून अन्नदानाहूनही ज्ञानदान सर्वश्रेष्ठ आहे. अन्नदानाने शरीराची तर ज्ञानदानाने जीवनाची तृप्ती होते. दिल्याने झीजही होऊ शकत नाही, उलट दिल्याने वाढ होते, असे गुरूच्या कृपेने प्राप्त होणारे ज्ञान हे यथार्थ ज्ञान असते. शिष्यांतही गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता असावी लागते. समाजात वावरताना खूप गुरू भेटतात. अज्ञानरूपी ज्ञानावर प्रकाश टाकतो, तो खरा गुरू होय, असे महाराजांनी शेवटी सांगितले.

याप्रसंगी सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष हरिशरणगिरी महाराज, निलगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगेंद्रगिरी महाराज, विष्णुगिरी महाराज, ज्ञानानंदगिरी महाराज, विश्वनाथगिरी महाराज, चैतन्यगिरी महाराज, रामभाऊ महाराज, राजेश्वरगिरी महाराज, विक्रम महाराज, गणेश कारखान्याचे माजी चेअमन मुकुंदराव सदाफळ, माजी संचालक मधुकर कोते, राजेंद्र कुलकर्णी, भाजपाचे माजी श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बबन मुठे, अशोकचे संचालक निरज मुरकुटे, जालिंदर मुठे आदी उपस्थित होते. या सप्ताह कमिटीचे व्यवस्थापक मधुकर महाराज यांनी शेवटी उद्याच्या कार्यक्रम व नियोजनाची रूपरेषा सांगितली.

लाखो भाविकांनी घेतला पाच टँकर आमटीचा अस्वाद
पहिल्या दिवशी पुरणपोळी, मांडे, दूध या महाप्रसादाचा दोन लाखांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. काल आमटी भाकरी महाप्रसादाच्या पहिल्या दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांनी दुपारी तीन वाजेपर्यंत चार, तर सायंकाळी एक असा एकूण पाच टँकर आमटीचा अस्वाद घेतला, असे स्वयंपाकगृहाचे प्रमुख शिंदे कॅटस, येवला यांनी सांगितले.

प्रथमच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 वरिष्ठ अधिकारी व 310 महिला-पुरुष पोलीस कर्मचारी, गोदावरीच्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफचे 2 अधिकारी व 40 जवान असा तगडा पोलीस बंदोबस्त सप्ताहाच्या इतिहासात प्रथमच तैनात करण्यात आला आहे. गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याने कमालपूर बंधार्‍यावर सर्वाधिक बंदोबस्तासाठी एक डिश आरएफचे जवान तैनात होते.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....