
नाशिक | प्रतिनिधी Nashik
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी नाशिकमधील विविध मतदान केंद्रांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. कोणताही पात्र मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांनी घराघरांत जाऊन गणनापत्रके भरून घ्यावीत, स्वयं-नोंदणी (सेल्फ एन्युमरेशन) वाढवावी तसेच कामात वेग, अचूकता आणि पारदर्शकता राखावी, असे निर्देश त्यांनी दिले.
चोक्कलिंगम यांनी नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड-देवळाली या चार विधानसभा मतदारसंघांतील विशेष शिबिरे, घरभेटी आणि बीएलओंच्या कामाची पाहणी केली. पार्क साईड बिल्डिंग परिसरातील विशेष शिबिराला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि गणनापत्रक भरण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच उत्तमनगर येथे घरभेटीदरम्यान मतदारांना ईएफ फॉर्म, स्वयं-नोंदणी आणि आवश्यक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गोवर्धन येथील जिल्हा परिषद शाळेत बीएलओ आणि बीएलए यांच्याशी संवाद साधताना मतदार यादीतील समान छायाचित्र असलेल्या नोंदींची तातडीने पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वडाळा गावातील घरभेटीदरम्यान प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांची नोंद सुनिश्चित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
दौऱ्याच्या शेवटी चोकलिंगम यांनी नाशिक तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील ईएफ फॉर्मच्या संगणकीकरणाच्या कामाचाही आढावा घेतला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून संगणकीकरणाची प्रक्रिया वेळेत आणि त्रुटीविरहित पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे, जिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह विविध विधानसभा मतदारसंघांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.




