गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या विंचूरमधील बेकायदा धंद्यांचा पंचनामा केल्यानंतर असंख्य लोकांनी बरे झाले, आमच्या मूक गार्हाण्यांना वाचा फोडली अशी प्रतिक्रिया दिली. जो काही पंचनामा केला तो ठराविक धंद्यांचाच होता, अद्याप आणखीही काही उद्योगांची दखल घेणे बाकी आहे. विंचूर औद्योगिक वसाहतीची मोकाट जागा सध्या ज्या कारणांसाठी वापरली जात आहे, त्याचाही एकदा सोक्षमोक्ष लावायला हवा. उद्योगांची वानवा असल्याने या संरक्षित पण मोकळ्या जागेवर सध्या दररोज सायंकाळी मधुशाळा भरते. हॉटेलात जाण्यापेक्षा येथील खुला आसमान मद्यपींना चांगलाच भावला आहे. दारूच्या बाटल्या आणि चकना घेऊन तेथे गेले की पैशांचीही बचत होते आणि कोणाच्या नजरेच्या टप्प्यातही येत नाही. तीन पत्ती जुगारासाठी तर ही मधुशाळा नंतर कसिनो बनून जाते. सोबतच इतरही काही अवैध धंदे चालत असले तरी अद्याप त्याची फारशी वाच्यता नाही. विंचूरमध्ये गुटख्याचेही मुबलक प्रमाण आहे.
राज्यात गुटख्याला बंदी असली तरी विंचूरला मात्र राजरोस गुटखा मिळतो आणि येथूनच तो इतरत्र पाठविलाही जात असल्याचे सांगितले जाते. राहता राहिला गांजा. हादेखील असेच एक बंदी घातलेला अंमली पदार्थ. त्यालाही येथील मंडळींनी आपलेसे केलेले. हे सारे पाहिले की उडता पंजाब या सिनेमाची हटकून आठवण होते. गेल्या आठवड्यात येथे एम़डी हे अंमली पदार्थ सापडले. त्यातून विंचूर हे एक नवेच केंद्र तयार झाल्याचे पुढे आले. कारण गेल्या वर्षभरापासून संपूर्ण राज्यातूनच या एमडीची हकालपट्टी करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. नाशिकमध्ये तर त्याचे कारखानेही उद्ध्वस्त केले गेले. या व्यवसायातील छोटी भाभी म्हणून कूप्रसिद्ध असलेल्या महिलेला पकडल्यानंतर नाशिकमधील एमडीच्या व्यवहारावर मर्यादा जरूर आल्या; परंतु यातील बदमाशांनी विंचूरसारख्या गावाची त्यासाठी निवड केलेली दिसते.
या प्रकरणात पकडलेल्या गृहस्थाच्या भावाचे जानोरी येथे विमानतळ परिसरात फॅक्टरी शेड आहे. तेथे या एमडीचा साठा किंवा निर्मिती केली जात असल्याचा संशय आहे. या शेडच्या मालकाची पत्नी पोलीस खात्यात असल्याने या प्रकरणातूनही फार काही बाहेर येणार नाही, असे लोक छातीठोकपणे सांगतात. तीन वर्षांपूर्वी तर एका महान व्यक्तीने ५०० व १००० मूल्यांच्या बनावट नोटांचा कारखानाच सुरू केला होता. तेव्हाही बाहेरच्याच पोलिसांनी धाड टाकून त्याला जेरबंद केले होते. हे महाशय अजूनही कारागृहाची हवा खात असले तरी त्याचे भाईबंद मात्र इतर बेकायदा धंद्याच्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करून घेत आहेतच.
लासलगाव-विंचूर हा निफाड तालुक्यातील भाग येवला विधानसभा मतदार संघाला जोडला गेलेला आहे. साहजिकच, या परिसरावर गेल्या वीस वर्षांपासून छगन भुजबळ यांचा प्रभाव आहे. विकासपुरुष म्हणून भुजबळांची प्रतिमा आहे. या भागाबरोबरच येवला शहर तसेच ग्रामीण भागातही भुजबळांनी केलेल्या विकासकामांची दखल संपूर्ण राज्याने वेळोवेळी घेतलेली आहेच. दस्तुरखुद्द भुजबळांनाही विकासाचा दृष्टिकोन आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा मानस सर्वश्रुत आहे. येवल्यातील विविध विकासकामांमधून भुजबळांच्या सौंदर्यदृष्टीचाही प्रत्यय येतो. अशा जागल्या विकासपुरुषाच्या नजरेतून विंचूरचे हे बदलते रूप कसे सुटले, असा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तर विंचूरमधील अवैध व्यवसायांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. सामान्यांच्या नजरेतूनही हे बदल सहज टिपता येतात.
नाशिकचे पोलीस जाऊन काही कारवाया करतात, याचाच अर्थ स्थानिक ठिकाणी काहीतरी असे आहे की ते अशा व्यवसायांना पोसत असावेत. जे काही चालले आहे ते भयंकर आहे यात वाद नाहीच. परंतु आताच त्याला आळा घातला नाही तर विंचूरच्या शांततेला ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी, म्हणजेच साधारण पंधरा वर्षांपूर्वी राजकीय दंगलीत या गावाने फार सोसले आहे. गावातील नागरिकांनाही अतोनात त्रास झाला होता. अनेकांचे आयुष्य बरबाद झाल्याचे याचि देहि याचि डोळा सर्वांनी पाहिले आहे. आज ती खपली काढण्याचा हेतू नव्हता; परंतु सर्वांनाच हा जुना आरसा दाखवणे गरजेचे होते. ते वाईट दिवस पुन्हा येऊ द्यायचे नसतील तर विंचूरमधील हा विषाचा विंचू आताच ठेचला पाहिजे. हे करायचे असेल तर भुजबळांनी एकदा या गावाचा फेरफटका मारावा.
माहीतगारांकडून प्रथम गोपनीय माहितीही घ्यावी. कारण भुजबळ आले की कसे सगळे छान छान केले जाते. ते टाळावे लागेल. पोलिसांच्या खबर्यांकडूनही बरीच माहिती मिळू शकते. परप्रांतीय मजुरांकडे अधिक लक्ष द्यायला हवेच, पण त्यांच्या आडून आपली कोण मंडळी या व्यवसायावर नागोबा बनून बसली आहे, याचा शोध घ्यावा लागेल. भुजबळांना हे अवघड काहीच नाही. विंचूरला उद्या काहीही वेगळे घडले तरी लोक साहेबांकडेच जातील. त्यामुळे साहेबांनी ती वेळ न येऊ देताच तेथे जे काही वेगळे चालले आहे, त्याची माहिती घ्यावी. भुजबळांनी मोठ्या कष्टाने या गावात जे काही रुजविले त्याची वाताहत होणार नाही, हे मात्र कटाक्षाने पाहिले पाहिजे.





