संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर शहरातील कुंथूनाथ हौसिंग सोसायटीत बुधवार दि.18 फेब्रुवारी सकाळी बिबट्या शिरल्याने धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर वन विभागाच्या पथकाकडून त्या बिबट्याचा शोध सुरू आहे. तर नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे.
कुंथूनाथ हौसिंग सोसायटीत सिद्धार्थ ओहरा हे वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्नी पल्लवी ओहरा या सकाळी बंगल्यालाच खेटून असलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या दिशेने बिबट्या येत असल्याचे पाहून त्या घाबरून गेल्या आणि त्यांनी थेट मंदिरात धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ बिबट्याही मंदिरात शिरला. त्यावेळी सुदैवाने पल्लवी ओहरा यांनी सावधानता बाळगत पटकन त्या मंदिराबाहेर येत बंगल्यात शिरल्या आणि बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद केला. यानंतर बिबट्या देखील मंदिराबाहेर आला होता. यानंतर पल्लवी ओहरा यांनी घरातील इतर सदस्यांना सावध केले. त्यांच्या धाडसामुळे संभाव्य अनर्थ टळला. यानंतर सिद्धार्थ ओहरा यांनी सोसायटीतील नागरिकांना बिबट्या आल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार, वनपाल युवराज तसेच वनरक्षक संतोष पारधी यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याचा शोध सुरू केला. दरम्यान, वनविभागाचे पथक पोहोचेपर्यंत बिबट्याने तेथून धूम ठोकली होती. ओहरा कुटुंबियांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मंगळवारी रात्री बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्या कंपाउंडच्या भिंतीवरून आत शिरल्याचे स्पष्ट दिसून आले. भरसकाळी वस्तीभागात बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही शहरातील विविध भागांत बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
कुंथूनाथ हौसिंग सोसायटीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी लहान मुलांना एकटे बाहेर खेळण्यासाठी पाठवू नये तसेच सकाळी किंवा संध्याकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्या ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. याचबरोबर वनविभागाची टीम परिसरात बिबट्याचा शोध घेत असून थर्मल ड्रोनच्या साहाय्याने देखील शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. बिबट्याचे पायांचे ठसे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. तसेच ज्यांच्या मोकळ्या जागा आहेत. त्या जागेत काटवन वाढले आहे. त्या जागेची साफसफाई होणे गरजेचे आहे. जेणेकरून बिबट्यांना लपता येणार नाही.
– अमरजित पवार (सहाय्यक- वनसंरक्षक)





